नाशिक डिसकनेक्ट : ऐन दिवाळीत विमानसेवा जमिनीवर

Nashik Disconnect www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

सर्वाधिक वेगाने विकसित होणार्‍या शहरांच्या यादीत आघाडीवर असलेल्या नाशिकची विमानसेवा ऐन दिवाळीत बंद करण्याचा निर्णय अलायन्स एअर या कंपनीने घेतल्याने नाशिकच्या उद्योग विश्वाला मोठा धक्का बसला आहे. या धक्क्यातून सावरत नाही तोच स्टार एअरनेही आपली सेवा बंद करण्याचा निर्णय घेतल्याने, नाशिकच्या विकासाची गतीच जणू काही मंदावली आहे.

नाशिकची विमानसेवा व्यापार, उद्योगाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण मानली जात आहे. विमानसेवेमुळे अनेक मोठे उद्योग आकर्षित होत आहेत. रेल्वे, रस्ते तसेच विमानसेवा अशा तिन्ही प्रकारात नाशिकचे दळणवळण वेगवान असल्याने, नाशिकमध्ये अनेक मोठे उद्योग येण्याच्या मार्गावर आहेत. रिलायन्स समूहानेदेखील नाशिकमध्ये आपला विस्तार करताना दळणवळणाचा विचार प्रामुख्याने केला होता. अशात दोन मोठ्या विमान कंपन्यांनी अचानकच विमानसेवा बंद करण्याचा निर्णय घेतल्याने, वेगवान दळणवळणाची शृंखला काहीशी खंडित झाली आहे. अलायन्स एअर आणि स्टार एअर या कंपनीच्या निर्णयाला अनेक कंगोरे आहेत. केंद्र सरकारच्या उडान योजनेचे कारण दिले जात असले तरी, देशातील काही राज्यांमधील आगामी निवडणुकांमुळे नाशिकची विमानसेवा इतरत्र वळविल्याचेही सांगितले जात आहे. अलायन्स एअरकडून नाशिक-पुणे, नाशिक-अहमदाबाद, नाशिक-अहमदाबाद-दिल्ली व नाशिक-पुणे-बेळगाव ही तर स्टार एअरकडून नाशिक-बेळगाव ही सेवा बंद करण्यात आली आहे. सद्यस्थितीत स्पाइस जेट याच कंपनीची विमानसेवा सुरू असून नाशिक, दिल्ली आणि हैदराबाद या दोन शहरांनाच कनेक्ट आहे. विशेष बाब म्हणजे नाशिक अर्थात ओझरवरून विमानसेवा सुरू करताना विमान कंपन्यांसाठी या सेवा फायदेशीर ठरत होत्या. याला कारण म्हणजे मुंबई रिजनमधील ठाणे जिल्ह्यातील कल्याणपासूनचे प्रवासी विमानसेवेला मिळत होते. त्यामुळे ओझर विमानतळावरून विमानसेवा बंद झाल्याने एअर ट्रॅफिकवरदेखील गंभीर परिणाम होणार असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.

दोन कंपन्यांनी आपल्या सेवा अचानकच बंद केल्याने, त्याचा मोठा फटका नाशिकच्या व्यापार व उद्योग क्षेत्राला बसणार आहे. कंपन्यांशी बोलणी सुरू आहे. मात्र, लोकप्रतिनिधींनी यामध्ये लक्ष केंद्रित करून सेवा पूर्ववत करण्याबाबत प्रयत्न करायला हवेत. – मनीष रावल, अध्यक्ष, आयमा एव्हिएशन कमिटी.

आता केवळ स्पाइस जेटच्या सेवेचाच आधार…..

अलायन्स एअर व स्टार एअर या दोन कंपन्यांनी आपल्या सेवा 1 नोव्हेंबरपासून बंद करण्याचा निर्णय घेतल्याने, आता नाशिकच्या विमानसेवेला केवळ स्पाइस जेटचा आधार आहे. सद्यस्थितीत या कंपनीकडून हैदराबाद, दिल्ली या दोन शहरांना जोडणारीच सेवा सुरू आहे.

राजकीय इच्छाशक्तीचा अभाव…

अलायन्स एअर व स्टार एअर या दोन कंपन्यांनी अचानकच सेवा बंद करण्याचा निर्णय घेतल्याने नाशिकच्या उद्योग विश्वाला मोठा धक्का बसला आहे. या सेवा बंद करण्यामागचे निश्चित कारण अद्याप समोर आले नसले तरी, इतर राज्यांतील आगामी निवडणुकांचा त्यास संदर्भ दिला जात आहे. मात्र, हे सांगितले जात असताना नाशिकमधील राजकीय इच्छाशक्तीचा अभाव असल्याचेही प्रकर्षाने जावणते.

अलायन्सकडून सेवा बंद…

नाशिक-पुणे,
नाशिक-अहमदाबाद,
नाशिक-अहमदाबाद-दिल्ली
नाशिक-पुणे-बेळगाव

स्टारकडून सेवा बंद – नाशिक-बेळगाव

स्पाइस जेट ची सेवा सुरू – नाशिक दिल्ली
आणि हैदराबाद

 

हेही वाचा:

The post नाशिक डिसकनेक्ट : ऐन दिवाळीत विमानसेवा जमिनीवर appeared first on पुढारी.