Site icon

नाशिक : डीजेचा दणदणाट करताहेत, तर जरा सांभाळून

नाशिक (मालेगाव) : सुदर्शन पगार
लग्नसराईसोबतच ध्वनिप्रदूषणाचा हंगाम सुरू होतो. सध्या दाट लग्नतिथी सुरू झाल्याने रात्री उशिरापर्यंत ठिकठिकाणी डीजे आणि बँड वाजविण्याच्या स्पर्धेने नागरिकांना सायंकाळ आणि रात्र काढणे आव्हानात्मक ठरत आहे. विशेष म्हणजे, यंदा सकाळी 8 पासूनच डीजे आणि त्यावर बेसूर गायकांचा कर्णकर्कश आलाप ऐकायला पडत आहे. हा गोंगाट वृद्ध आणि परीक्षार्थी विद्यार्थ्यांसाठी अत्यंत त्रासदायक ठरतो. परंतु, तक्रारींअभावी कार्यवाही होताना दिसत नाही. मात्र, हा विषयी अपर पोलिस अधीक्षक अनिकेत भारती यांनी गांभीर्याने घेऊन नियम पालनाचे सक्त आदेश दिल्याने कार्यवाही सुरू झाली आहे.

त्रास सर्वांनाच, तक्रार करणार कोण?
महानगरांसह मोठ्या शहरात विशिष्ट मार्गांवर मंगल कार्यालये, लॉन्सचा विकास झाला आहे. बहुतांश वेळ दाट लग्नतिथीला या सर्वच कार्यालयांमध्ये दुपारी आणि सायंकाळी लग्नाचा बार उडतो. तेव्हा या भागांतून मार्गक्रमण करताना सर्वांचीच छाती धडधडते. तर स्थानिक नागरिकांचे हाल न विचारलेलेच बरे. मंगल कार्यालयांपूर्वी लग्न असलेल्या घरात मांडवाची सकाळ आणि रात्र ही त्या परिसरातील नागरिकांच्या कानठळ्या फोडणारी असते. अलीकडे तर मेंंदी, संगीत या अतिरिक्त उत्साह पर्वणींची भर पडल्याने एका दिवसाचा त्रास तीन दिवसांवर गेला आहे, तरी हा स्थानिक मुद्दा ठरून सहसा कुणी तक्रार करण्यास पुढे धजावत नाही. कुणाच्या घरात हृदयरुग्ण अथवा बालक असल्यासच विनंती, सूचना होतात. परंतु, त्यादेखील सद्सद्विवेकबुद्धीवर सत्कारणी लागतात अथवा वादाचे निमित्त ठरतात.

केव्हा होते ध्वनिप्रदूषण?
सर्वसाधारणपणे मर्यादेपेक्षा जास्त आवाज, जो माणसाच्या आरोग्यावर परिणाम करतो, त्यास ध्वनिप्रदूषण म्हटले जाते. डेसिबलमध्ये ध्वनीचे प्रमाण मोजले जाते. सामान्यपणे साधल्या जाण्याच्या संवादाचा आवाजही 30 ते 50 डेसिबलपर्यंत पोहोचतो. तरी ते सुसह्य मानले जाते, तर लाऊडस्पीकर 80 ते 90 डेसिबल आवाज निर्माण करतो. फटाक्यांचा आवाज 140 डेसिबलपर्यंत, तर डीजेचा आवाज या सर्व पातळीवर जातो. वैद्यकीय तज्ज्ञांनुसार 80 डेसिबल एवढा आवाज सतत आठ तास ऐकला, तर बहिरेपणा येण्याची शक्यता असते. लग्नसराईत मांडवाच्या दिवशी सायंकाळ ते रात्री 10 – 11 तर कुठे मध्यरात्रीपर्यंत डीजे वाजविला जातो. किमान सहा तास सुरू राहणारा हा गोंगाट त्यात फटाक्यांची आतषबाजी ही वृद्ध आणि रुग्णांसाठीच नव्हे, तर सर्वसाधारण व्यक्तीलाही अवस्थ करण्यास पुरेसा ठरतो.

काय आहेत आदेश
सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश आर. सी. लाहोटी आणि न्यायमूर्ती अशोक भान यांच्या खंडपीठाने 2005 मध्ये एक महत्त्वपूर्ण आदेश दिला आहे. त्यात रात्री 10 ते सकाळी 6 या वेळेत कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी लाऊडस्पीकरवरून मोठ्या आवाजात संगीत वाजवणे, फटाके फोडणे आणि हॉर्न वाजवणे यावर बंदी घातली आहे.

आवाजाची मर्यादा कुठे किती?
ध्वनिप्रदूषण कायदा नियम, 2000 नुसार, शांतता क्षेत्र (रुग्णालये, शाळा, धार्मिक स्थळ, न्यायालये), निवासी, व्यावसायिक आणि औद्योगिक क्षेत्र असे चार विभाग केले आहेत. या प्रत्येक विभागात दिवसा व रात्रीच्या वेळी आवाजाची मर्यादा निश्चित केली आहे. शांतता क्षेत्रात सकाळी 6 ते रात्री 10 पर्यंत 50 डेसिबल, तर रात्री 10 ते सकाळी 6 पर्यंत 40 डेसिबल, निवासी विभागात अनुक्रमे 55 व 45, व्यावसायिक विभागात 65 व 55 आणि औद्योगिक क्षेत्रात 75 व 70 डेसिबलपर्यंत आवाजाची मर्यादा देण्यात आली आहे.

नियम पायदळी तुडवून डीजे, बँड वाजवले जातात. ध्वनिप्रदूषणामुळे ज्येष्ठ नागरिक, बालक यांना मोठ्या प्रमाणावर त्रास होतो, याची दखल प्रदूषण नियंत्रण मंडळ, मालेगाव महानगरपालिका व पोलिस प्रशासन यांनी घेणे अत्यंत आवश्यक आहे. परंतु, ज्यांच्यावर जबाबदारी आहे, तेच याकडे कानाडोळा करतात. याची दखल घेऊन शासनाने कठोर कारवाई केली पाहिजे. शहरात डीजे आणि बँडच्या वाहनांमुळे वाहतूक कोंडीही होते. ती थांबवणे आवश्यक आहे. – निखिल पवार, सामाजिक कार्यकर्ते.

जिल्ह्यातील पहिली जप्ती मालेगावात
सोयगाव भागातील मंगल कार्यालयांमध्ये विवाह सोहळ्यांमध्ये डीजे व बँडच्या ध्वनिप्रदूषणाविरोधात तक्रारी वाढल्यानंतर तत्कालीन अपर पोलिस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी 2018 मध्ये धडक कारवाई केली होती. विशेष पोलिस पथकाचे प्रमुख कल्पेशकुमार चव्हाण यांनी मंगल कार्यालयाजवळ डीजेंच्या ध्वनीचे मोजमाप घेतले. त्यात ध्वनिपातळी 113 डेसिबल नोंदविली जाताच थेट डीजे व वाद्य साहित्य जप्त केले होते. तेव्हा ही जिल्ह्यातील पहिलीच कारवाई ठरली होती. दोन कारवायांनंतर काही प्रमाणात वचक बसला होता.

The post नाशिक : डीजेचा दणदणाट करताहेत, तर जरा सांभाळून appeared first on पुढारी.

Exit mobile version