नाशिक : डेंग्यू निर्मूलनासाठी ग्रामीण भागात ‘एक दिवस कोरडा’

डेंग्यू

नाशिक : वैभव कातकाडे

शहरात डेंग्यूचा प्रादुर्भाव वाढत असताना जिल्ह्याच्या ग्रामीण भागात मात्र याचे प्रमाण अत्यल्प आहे. जिल्ह्याच्या आरोग्य विभागाने याबाबत केलेले महत्त्वपूर्ण नियोजन डेंग्यूच्या आजाराला आळा घालण्यास सहाय्यभूत ठरले आहे. गावागावांमध्ये आठवड्यातील कोणताही एक वार कोरडा दिवस म्हणून पाळण्यात येतो. यामुळे महापालिका क्षेत्रात शेकडोने डेंग्यूच्या रुग्णांची संख्या वाढत असताना ग्रामीण भागात खबरदारी घेतल्याने रुग्णसंख्या कमी आहे. (Dengue in nashik)

कोरडा दिवस या संकल्पनेमध्ये आठवड्यातील एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळला जातो. या दिवशी घर परिसरातील पाण्याचे सर्व भांडे धुऊन, घासून, पुसून कोरडे करण्यात येतात. यामुळे डेंग्यूच्या डासाची उत्पत्ती जरी कुठे होत असेल तरीही या स्वच्छतेने ते निघून जाण्यास मदत होते. स्वच्छ पाण्यावर डेंग्यूच्या डासांची वाढ होते. यामुळे पाणी साचणाऱ्या ठिकाणी स्वच्छता केली जाते. आवारात मोठी विहीर, तळे असे काही असेल तर त्यामध्ये गप्पी मासे टाकतात. गप्पी माशांमुळे डेंग्यूचे डास तयार होण्याला प्रतिबंध बसतो. तसेच आरोग्य विभागामार्फत नागरिकांना वेळोवेळी आवाहन करण्यात येते. जनजागृतीच्या माध्यमातून डेंग्यूपासून कशी काळजी घ्यावी याचे धडे दिले जात आहेत. यामध्ये पूर्ण कपडे घालावे, मच्छरदाणीचा वापर करावा, डासरोधक साधनांचा वापर वाढवावा यांचा समावेश आहे. (Dengue in nashik)

ग्रामीण भागामध्ये फक्त जनजागृती आणि वेळोवेळी सूचना यांच्या जोरावर डेंग्यूचा प्रसार रोखला आहे. यामध्ये मोठ्या प्रमाणात आरोग्यसेवक, कर्मचारी यांनी गावकऱ्यांना सूचित केले आहे. जर कोणाला लक्षणे असतील तर ताबडतोब रक्ताची चाचणी करावी.
– डॉ. सुधाकर मोरे, जिल्हा आरोग्य अधिकारी
जिल्हा परिषद, नाशिक

हेही वाचा :

The post नाशिक : डेंग्यू निर्मूलनासाठी ग्रामीण भागात 'एक दिवस कोरडा' appeared first on पुढारी.