नाशिक ‘डेंजर झोन’मध्ये! कोरोनाचे मृत्यू ‘डबल डिजिट’; धक्कादायक माहिती समोर

नाशिक : लॉकडाउनमध्ये सामान्य माणूस टिकणार नाही, अशी भावनिक साद सोशल मीडियातून घालण्यात येत आहे. याच पार्श्‍वभूमीवर नाशिक शहर आणि जिल्ह्याची स्थिती नेमकी काय आहे? याची माहिती आरोग्य यंत्रणेकडून घेतल्यावर नाशिक कोरोना संसर्गाबरोबर उपचार सुविधांमध्ये ‘डेंजर झोन’मध्ये पोचल्याची धक्कादायक माहिती पुढे आली.

नाशिक ‘डेंजर झोन’मध्ये 

फेब्रुवारीच्या पहिल्या दोन आठवड्यांच्या तुलनेत आता कोरोनाग्रस्त बरे होण्याच्या प्रमाणात १३ टक्क्यांनी घसरण झाली असताना ‘डबल डिजिट’मध्ये मृत्यू पोचलेत. कोरोनाग्रस्तांची संख्या झपाट्याने वाढत असताना उपचाराच्या सुविधा आता वाढवायच्या म्हटले, तरीही त्यासाठी अपेक्षित मनुष्यबळ आणायचे कोठून? असा गंभीर प्रश्‍न आरोग्य व्यवस्थेपुढे उभा ठाकलाय. 

अपेक्षित मनुष्यबळ आणायचे कोठून?
नाशिकमध्ये ११ फेब्रुवारीला बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण ९७.२५ टक्के होते. ते आता ८४.११ टक्के आहे. नाशिक शहरात ९७.९७ टक्के होते. ते आता ८५.४४ टक्क्यांपर्यंत कमी झाले. ग्रामीणमधील हेच प्रमाण ९६.३६ टक्क्यांवरून ८२.१९, तर मालेगावमधील ९२.८५ टक्क्यांवरून ७८.०९ टक्क्यांपर्यंत घसरले आहे. मृत्यूचे नाशिकमधील प्रमाण १.०३, ग्रामीणमधील १.७७, तर मालेगावमधील २.३७ टक्के इतके झाले आहे. ग्रामीणमधील मृत्यूची वाढलेली संख्या चिंताजनक अवस्थेत पोचली आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी मृत्यूचे प्रमाण कमी होत असल्याची स्थिती शहर आणि जिल्हावासीयांनी पाहिली आहे.

हेही वाचा - पहिल्‍या दिवशी पॉझिटिव्ह कोरोना रिपोर्ट; दुसऱ्या दिवशी निगेटिव्ह! हा तर जिवासोबत खेळ  

मृत्यू झाल्यावर खाट मिळते हे धगधगते वास्तव

आता ऑक्सिजनच्या खाटा उपलब्ध होणाऱ्यावर प्रचंड मर्यादा आल्या आहेत. जिल्हा रुग्णालयात तीन दिवसांपासून व्हेंटिलेटरची खाट मिळत नाही. कोरोनाग्रस्त रुग्ण बरे झाल्यावर अथवा मृत्यू झाल्यावर खाट मिळते हे धगधगते वास्तव पुढे आले आहे. कोरोनाग्रस्त रुग्णांपैकी चार टक्के रुग्णांना ऑक्सिजनची, तर एक टक्का रुग्णांना व्हेटिंलेटरची आवश्‍यकता भासते, अशी स्थिती आजवरच्या आकडेवारीवरून दिसत आहे. प्रत्यक्षात लक्षणे नसलेले रुग्ण घरी राहून उपचार घेत असताना प्रकृतीत बिघाड होऊन पुन्हा उपचाराची गरज भासत असल्याने रुग्णालयात, आरोग्य केंद्रात दाखल व्हावे लागते, अशी अनेक उदाहरणे अलीकडच्या काळात घडली आहेत. त्यामुळे उपलब्ध ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटरची सुविधा कोरोनाग्रस्त रुग्णांच्या वाढणाऱ्या संख्येचा वेग पाहता, कितीपत पुरेशी ठरणार याचा विचार खऱ्या अर्थाने होतोय काय?. म्हणूनच अर्थचक्र सुरू ठेवत असताना माणसांना जगवण्यासाठी काय करायचे? असा खुलेआम प्रश्‍न वैद्यकीय क्षेत्रातून उपस्थित होत आहे. 

हेही वाचा - सख्ख्या भावांची एकत्रच अंत्ययात्रा पाहण्याचे आई-बापाचे दुर्देवी नशिब; संपूर्ण गाव सुन्न 

आउटसोर्सिंगवर होईना पुनर्विचार 
कोरोनाग्रस्तांची संख्या जशी झपाट्याने वाढते तशी स्वॅब चाचणी स्थानिक पातळीवर करून घेण्याविषयी गंभीर विचार का होत नाही? या प्रश्‍नाने डोके वर काढले आहे. राज्यात सर्वांत अगोदर मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेने डॉ. वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात खासगी प्रयोगशाळा सुरू केली. संस्थेने स्वतःची एक कोटीची गुंतवणूक करून अद्ययावत यंत्रसामग्री सुरू केली. पण यापूर्वी स्वॅबच्या चाचण्यांचे ‘आउटसोर्सिंग’ करण्याविषयीच्या धोरणाचा पुनर्विचार काही केल्या का होत नाही? याचे कोडे नाशिककरांना उलगडत नाही. जिल्हा रुग्णालयातील आणि डॉ. पवार रुग्णालयातील प्रयोगशाळा पूर्ण क्षमतेने शहर आणि जिल्ह्यासाठी सुरू करण्याचा निर्णय घेतला गेल्यास ‘सुपर स्‍प्रेडर’ना अटकाव करणे शक्य आहे. मात्र हे का घडत नाही? असा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे.

शहरवासीयांमधील धाकधूक वाढली

सद्यःस्थितीत काय घडते? कोरोना चाचणीसाठी स्वॅब दिलेल्यांचा अहवाल येण्यासाठी किमान दोन दिवसांचा कालावधी लागतो. अशांचा अहवाल आल्यावर त्यांच्यासाठी एक तर उपचाराची व्यवस्था करण्यासाठी कुटुंबीयांची दमछाक होते. दुसरे म्हणजे, स्वॅबचा अहवाल आला नसल्याने ‘सुपर स्प्रेडर' बंदच्या काळातही रस्त्यांवरून हिंडणाऱ्यांमध्ये कोण आहेत? याची पडताळणीची व्यवस्था नसल्याने लागणचे प्रमाण वाढत नाही नाही ना? अशी शहरवासीयांमधील धाकधूक वाढली आहे. 
 
कोरोनाविषयक विश्‍लेषणात्मक स्थिती 
(नाशिक शहर आणि जिल्हा) 

पॉझिटिव्ह रुग्ण लक्षणांचे रुग्ण लक्षणे नसलेले रुग्ण व्हेटिंलेटरवरील रुग्ण ऑक्सिजनवरील रुग्ण 
१६ सप्टेंबर २०२० २८ मार्च २०२१ १६ सप्टेंबर २०२० २८ मार्च २०२१ १६ सप्टेंबर २०२० २८ मार्च २०२१ १६ सप्टेंबर २०२० २८ मार्च २०२१ १६ सप्टेंबर २०२० २८ मार्च २०२१ 
१० हजार ४७६ २४ हजार ९७८ २ हजार ९६२ ४ हजार ४४० ७ हजार ५१४ २० हजार ५३८ १३९ १९३ १ हजार १७४ ९४५ 
(१७ मार्च २०२१ रोजी ः पॉझिटिव्ह रुग्ण-१० हजार ८५१, लक्षणांचे रुग्ण-२ हजार १४६, लक्षणे नसलेले रुग्ण-८ हजार ७०५, व्हेटिंलेटरवरील रुग्ण-१५३, ऑक्सिजनवरील रुग्ण-६१५) 
......