नाशिक : डॉ. अद्वय हिरे ठाकरे गटात; भाजपला धक्का

डॉ. अद्वय हिरे www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

भारतीय जनता पक्षाचे युवा नेते तथा नाशिक जिल्हा कृषी औद्योगिक संघाचे चेअरमन डॉ. अद्वय हिरे यांनी भाजपला सोडचिठ्ठी देण्याचा निर्णय घेतला असून, लवकरच ते उद्धव बाळासाहेब ठाकरे (शिवसेना) गटात प्रवेश करणार आहेत. डॉ. हिरे यांनी रविवारी कार्यकर्त्यांसोबत बैठक घेऊन याबाबतचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, भाजपसाठी हा मोठा धक्का असून, शिंदे गटाचे पालकमंत्री दादा भुसे यांना मात देण्यासाठी ठाकरे गटाची ही मोठी रणनीती असल्याचे बोलले जात आहे.

एकीकडे नाशिकमध्ये ठाकरे गटाला एकापाठोपाठ हादरे बसत असताना, ठाकरे गटाने थेट डॉ. अद्वय हिरे यांना गळाला लावले आहे. विशेष म्हणजे डॉ. हिरे यांना ठाकरे गटाने आपल्या पक्षाचे दरवाजे उघडून एका निशाण्यात दोन शिकार केल्याची चर्चा आता रंगत आहे. एक तर ठाकरे गटाने हा भाजपला मोठा धक्का दिला असून, दुसरे म्हणजे शिंदे गटाचे मंत्री दादा भुसे यांच्यासमोर आव्हान निर्माण केले आहे. दरम्यान, डॉ. हिरे यांनी नुकतीच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन लवकरच पक्षप्रवेश करणार असल्याचे स्पष्ट केले आहे. डॉ. हिरे २००९ पासून भाजपमध्ये असून, ते जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष आहेत. त्याचबरोबर जिल्हा कृषी औद्योगिक संघाचे ते चेअरमन आहेत. मालेगावसह नाशिक जिल्ह्यात त्यांनी भाजपचा कार्यकर्ता म्हणून अनेक आंदोलने केली आहेत. त्यामुळे भाजपला सोडचिठ्ठी देण्याचा निर्णय भाजपसाठी मोठा धक्का असणार आहे. कारण त्यांच्यासह अनेक कार्यकर्ते ठाकरे गटात प्रवेश करण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे ठाकरे गटाला त्यांचा प्रवेश मोठा आधार ठरण्याची शक्यताही वर्तविली जात आहे.

कार्यकर्त्यांच्या भावना जाणून घेतल्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात काम करण्याचे ठरविले आहे. २००९ पासून मी भाजपमध्ये काम करतो आहे. इतके दिवस चांगल्या पद्धतीची वागणूक पक्षात दिली जात होती. मात्र, शिंदे गटाचे लोक आल्यापासून भाजप सातत्याने दुर्लक्ष व हेटाळणी करीत आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांना न्याय देणे शक्य होत नव्हते. आगामी निवडणुकीतसुद्धा आमच्या जेवढ्या जागा निवडून आल्या होत्या, त्यापेक्षा कमी जागा दिल्या जात हाेत्या. त्यामुळे त्यांच्यासोबत राहणे शक्य नव्हते. विशेष म्हणजे ही बाब पक्षाचे नेते देवेंद्र फडणवीस, गिरीश महाजन, डॉ. सुभाष भामरे, डॉ. भारती पवार यांच्या कानावर घातली होती. पण त्यांच्याकडूनदेखील अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळेच उद्धव ठाकरे यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला. – डॉ. अद्वय हिरे

भुसे विरुद्ध हिरे
हिरे यांच्या उद्धव ठाकरे गटातील प्रवेशामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत भुसे विरुद्ध हिरे, असा सामना बघावयास मिळणार आहे. जेव्हा तुषार शेवाळे यांचा पराभव झाला होता, तेव्हा झालेल्या आभाराच्या सभेतच डॉ. हिरे यांनी आगामी विधानसभा निवडणूक लढविणार असल्याचे स्पष्ट केले होते. शिवाय हा शेवटचा पराभव असेल, असेही जाहीर केले होते, त्यामुळे आगामी काळात भुसे विरुद्ध हिरे हा सामना रंगणार आहे. ठाकरे गट यासाठी खास रणनीती आखणार असल्याचे समजते.

हेही वाचा:

The post नाशिक : डॉ. अद्वय हिरे ठाकरे गटात; भाजपला धक्का appeared first on पुढारी.