नाशिक : डोक्यावर बर्फ आणि जिभेवर साखर ठेवावीच लागेल! ;‘स्टाइस’च्या पदाधिकार्‍यांपुढील आव्हान

www.pudhari.news

सिन्नर : संदीप भोर
सिन्नर तालुका औद्योगिक सहकारी वसाहतीची (स्टाइस) निवडणूक जिंकल्यानंतर माजी आमदार राजाभाऊ वाजे यांचे समर्थक नामकर्ण आवारे चेअरमनपदी विराजमान झाले आहेत. गतवेळी विरोधी पॅनलमधून विजयी झाल्यानंतरही या निवडणुकीत आवारे यांच्या खांद्याला खांदा लावून काम केलेले सुनील कुंदे यांना व्हा. चेअरमनपदी संधी मिळाली. आता सत्तासूत्रे हाती घेऊन सत्ताधारी कामाला लागले आहेत. या सगळ्यात माजी आमदार स्व. सूर्यभान गडाख यांचे स्वीय सहायक, स्टाइसचे व्यवस्थापक ते याच संस्थेचे चेअरमन असा नामकर्ण आवारे यांचा थक्क करणारा जीवन प्रवास वेगळ्या उंचीवर पोहोचला आहे.

‘स्टाइस’ची प्रत्येक निवडणूक अटीतटीची होत असते. यंदा मात्र या संस्थेच्या इतिहासात प्रथमच तिरंगी लढत झाली. त्यामुळे चुरस वाढली होती. तीन पॅनलच्या 36 उमेदवारांनी उद्योजक मतदारांच्या उंबर्‍याची माती पार कमी केली. आमदार माणिकराव कोकाटे यांच्या समर्थकांचे मनोमिलन झाले नाही. एकाच गटाची दोन शकले उडाली. परिणामी ‘दोघांचे भांडण तिसर्‍याचा लाभ’ या म्हणीप्रमाणे आवारे गटाला सत्ता अबाधित ठेवण्यात यश आले. गेल्या पंचवार्षिक निवडणुकीत पॅनल उभारला. सत्ताही मिळवली, मात्र नामकर्ण आवारे संचालक मंडळात सहभागी नव्हते. बहुमत मिळाल्यानंतर आरंभी तज्ज्ञ संचालक व त्यानंतर तांत्रिक बाबींची जुळवाजुळव करीत ते संचालक झाले. सत्तेची सगळी समीकरणे जुळवून आणल्यानंतर चेअरमनपदाची अभिलाषा बाळगणे स्वाभाविक होते. त्यात काहीही वावगे नव्हते. मात्र एककल्ली कारभार… तत्कालीन चेअरमन अरुण चव्हाणके यांचा रबरी शिक्क्यासारखा वापर आणि फटकळपणाचा आरोप करीत आवारे यांनीच निवडून आणलेल्या एक, दोन नव्हे तर तब्बल पाच संचालकांनी स्वनेतृत्वाविरुद्ध एल्गार केला. त्यानंतरच्या काळात ज्या काही घडामोडी घडल्या त्या सिन्नरच्या उद्योगजगताने पाहिल्या आहेत. त्याचा बराच ऊहापोह होऊन गेला. असो.

जवळपास पंधरा वर्षे एकहाती सत्ता गाजविणारे माजी चेअरमन दिलीपराव शिंदे यांच्या सत्तास्थानाला सुरुंग लावून सत्ता मिळाल्यानंतरही आवारे यांना चेअरमनपद तर मृगजळ ठरलेच किंबहुना सत्तेचे समाधानही लाभले नाही. द़ृष्टिपथातील संस्थेच्या विकासाच्या, प्रगतीच्या योजना अर्धवट सोडाव्या लागल्या. शिंदे गटाच्या विरोधात निर्माण केलेल्या वातावरण निर्मितीवर पाणी फेरले गेले आणि शिंदे यांनी पंधरा वर्षे सत्ता सांभाळली. मात्र आवारेंना दोन वर्षेदेखील ते जमले नाही, यासह विविध प्रकारची टीकाटिप्पणी सहन करावी लागली. त्यामुळे आवारे अविचल आणि अस्वस्थ होते. म्हणूनच त्यांनी या निवडणुकीच्या निमित्ताने नेटाने खिंड लढविली. सत्तेचा सोपान यशस्वीरीत्या चढल्यानंतर त्यांची अस्वस्थता दूर झाली असेल हे वेगळे सांगण्याची गरज नाही. पण यापुढच्या काळात तरी ‘मागील पानावरून पुढे…’ असे होता कामा नये, अशी अपेक्षा उद्योजक सभासदांमधून व्यक्त होत आहे. विजयानंतर त्यांनी दिलेल्या प्रतिक्रियेनुरुप किमान स्वकीयांची मोट बांधून ठेवणे आणि विरोधकांनाही सोबत घेऊन चालण्याचे आव्हान पेलावे लागणार आहे. डोक्यावर बर्फ आणि जीभेवर साखर असली की सारे प्रश्न सुटतात, असे म्हणतात. पण तसे वागल्याने किंवा कृती केल्याने जरी सारे प्रश्न सुटणार नसले तरी किमान काही प्रश्न वाटेत आडकाठी बनून उभे राहणार नाहीत असे मानायला काय हरकत आहे?

कोकाटे समर्थक कुंदे आवारे गटात कसे?
राजकारणात काही उणे-काही अधिक होत असते. स्टाइसच्या गेल्या सहा-सात वर्षांच्या कार्यकाळात असे घडत राहिले. गत निवडणुकीत आमदार कोकाटे समर्थक दिलीपराव शिंदे यांच्यासमवेत विजयी झालेले दुसरे संचालक होते सुनील कुंदे. आमदार कोकाटे यांच्या आग्रहाखातर त्यांनी शिंदे गटातून निवडणूक लढविल्याचे त्यावेळी बोलले जात होते. मात्र निवडणुकीनंतर काही दिवसांतच त्यांनी आवारे गटाशी जुळवून घेतले. त्यामुळे त्यांनाही चेअरमन किंवा व्हा. चेअरमनपद भूषविण्याची संधी मिळेल अशी चिन्हे दिसू लागली. आवारे यांच्या विरुद्ध पंडित लोंढे, अविनाश तांबे, मीनाक्षी दळवी आणि रामदास दराडे यांनी स्वतंत्र गट तयार केला होता. त्यामुळे आवारे यांचे आदेश या गटाला शिरसावंद्य नव्हते. अशातच आवारे यांनी कुंदे यांना चेअरमनपदाची ऑफर केली. लोंढे चेअरमनपदाला चिकटून बसलेले होते. त्यांच्यासह या गटातील संचालकांनी कुंदे यांच्या नावाला प्रतिकूलता दर्शवली. त्याचाच राग कुंदे यांच्या मनात राहील्याची चर्चा आहे. त्यामुळेच हा गट आमदार कोकाटे यांच्या नेतृत्वाखाली पॅनलनिर्मिती करुन उभा राहिल्यानंतरही कुंदे यांनी आवारे यांच्यासोबत जाणे पसंत केले. कोकाटे समर्थक कुंदे आवारे गटात जाण्याला हे कारण असल्याचे बोलले जाते.

हेही वाचा:

The post नाशिक : डोक्यावर बर्फ आणि जिभेवर साखर ठेवावीच लागेल! ;‘स्टाइस’च्या पदाधिकार्‍यांपुढील आव्हान appeared first on पुढारी.