नाशिक :  ‘ड्रायपोर्ट’साठी राष्ट्रीय महामार्गाचा पुढाकार

ड्रायपोर्ट www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

निफाड येथे उभारण्यात येणाऱ्या ड्रायपोर्ट प्रकल्पाच्या उभारणीसाठी राष्ट्रीय महामार्ग लॉजिस्टिक मॅनेजमेंट कंपनीबरोबर काम करण्यास जेएनपीटी यांनी सहमती दर्शविली आहे. त्यामुळे राष्ट्रीय महामार्ग आणि जेएनपीटी हे संयुक्तपणे हा प्रकल्प उभारणार आहेत. यामुळे ड्रायपोर्टच्या कामाला गती मिळणार असल्याची माहिती खासदार हेमंत गोडसे यांनी दिली.

जिल्ह्यातील उत्पादित होणाऱ्या भाजीपाल्यासह द्राक्ष, कांदा, डाळिंब आदी शेतीमाल देश-विदेशात विक्रीसाठी जलदपणे पाेहचविता यावा, यासाठी ड्रायपोर्ट उभारण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. ड्रायपोर्टसाठी प्रस्तावित असलेल्या निफाड कारखान्याच्या जागेवर विविध कर थकीत आणि कर्ज असल्याने या जागेवर प्रकल्प होणे अवघड वाटत होते. हा प्रकल्प जिल्ह्याबाहेर जाऊ नये म्हणून खासदार गोडसे यांनी पुढाकार घेत या प्रकल्पासाठी नियोजित जागेवर काही अडचण असल्यास शिलापूर आणि मुंडेगाव येथील जागा ड्रायपोर्टसाठी सुचविला होत्या. ड्रायपोर्टच्या परिस्थितीवर मार्ग काढण्यासाठी नॅशनल हायवे लॉजिस्टिक मॅनेजमेंट पुढे सरसावले आहे. कंपनीकडून काही दिवसांपूर्वी जेएनपीटीला पत्र देत नाशिक येथे ड्रायपोर्ट उभारण्यासाठी सोबत काम करण्याची विनंती केली होती. जेएनपीटीने कंपनीच्या या प्रस्तावास सहमती दर्शविली असून, त्याबाबतची माहिती शिपिंग मंत्रालयाला कळविली आहे. त्यामुळे अडचण दूर होणार असून निफाडला ड्रायपोर्ट प्रकल्प उभारण्याचा मार्ग आता लवकरच सुकर होईल, अशी माहिती खा. गोडसे यांनी दिली.

लवकरच मान्यता : खा. गोडसे

राज्यात आयसीडीची (लोड कंटेनर डेपो) संख्या अधिक असल्याने नवीन आयसीडी प्रकल्पासाठी महाराष्ट्र रेड झोनमध्ये मोडत होता. त्यामुळे गेल्या काही वर्षांपासून ड्रायपोर्ट प्रकल्प प्रलंबित होता. ड्रायपोर्ट उभारणीच्या प्रस्तावास शिपिंग मंत्रालयाकडून मंजुरी व लवकरच प्रशासकीय मान्यता मिळेल, असा विश्वास खासदार हेमंत गोडसे यांनी व्यक्त केला आहे.

हेही वाचा:

The post नाशिक :  ‘ड्रायपोर्ट’साठी राष्ट्रीय महामार्गाचा पुढाकार appeared first on पुढारी.