नाशिक : ड्रोनवरील निर्बंध हटले, पोलिसांना मिळाली ‘ही’ महत्वाची माहिती

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
संरक्षण विभागाच्या कॅट्स आणि डीआरडीओच्या केंद्रांवर ड्रोनच्या माध्यमातून हेरगिरीच्या प्रयत्नानंतर शहरात ‘नो ड्रोन फ्लाय झोन’ जाहीर करताना, खबरदारी म्हणून शहर पोलिसांनी ड्रोन चालक-मालकांना त्यांच्याकडील ड्रोन जमा करण्यास सांगितले होते. महिनाभरात पोलिसांकडे 15 हून अधिक ड्रोन जमा झाले होते. पोलिसांनी मनाई आदेश वाढविले नसल्याने ड्रोनवरील निर्बंध कमी झाले असून, ड्रोन चालक-मालकांना दिलासा मिळाला आहे.

पोलिस आयुक्त जयंत नाईकनवरे यांनी 30 सप्टेंबरला मनाई आदेश लागू करीत ड्रोन चालक-मालकांना पोलिस ठाण्यांमध्ये ड्रोन जमा करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर 15 दिवसांनी पुन्हा मनाई आदेशास वाढ दिली होती. या कालावधीत 15 हून अधिक ड्रोन पोलिसांकडे जमा झाले होते. मनाई आदेशामुळे शहरात किती ड्रोन चालक-मालक आहेत, ड्रोन कोणत्या कंपनी व कोणत्या रेंजचे आहेत, याबाबतची संपूर्ण तांत्रिक माहिती शहर पोलिसांनी संकलित केली आहे. त्यामुळे संबंधित ड्रोन मालकांनी पोलिस ठाण्यात अर्ज करून आपापले ड्रोन परत घेऊन जावेत, असे आवाहन पोलिस आयुक्तांनी केले आहे. तसेच ड्रोनने चित्रीकरण करावयाचे झाल्यास पोलिस ठाण्यात सविस्तर अर्ज करून परवानगी घेत ड्रोनचा वापर करावा, असेही नाईकनवरे यांनी सांगितले आहे.

‘त्या’ ड्रोनचा शोध लागेना
शहरातील संवेदनशील क्षेत्रात ड्रोनची घुसखोरी झाल्याने पोलिसांनी ड्रोनचा शोध घेण्याचे प्रयत्न केले. मात्र, त्यांना याबाबत अद्याप ठोस माहिती किंवा पुरावा न मिळाल्याने ड्रोन किंवा ड्रोनचालकाचा शोध लागत नसल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी चौकशीत तज्ज्ञांचीही मदत घेतली, मात्र त्याचा फारसा फायदा मिळालेला नसल्याचे पोलिसांनी सांगितले.

हेही वाचा :

The post नाशिक : ड्रोनवरील निर्बंध हटले, पोलिसांना मिळाली 'ही' महत्वाची माहिती appeared first on पुढारी.