नाशिक : तंत्रज्ञानाधारे वंचित घटकांना प्रवाहात आणणार – जि. प. सीईओ अशिमा मित्तल

आशिमा मित्तल,www.pudhari.news

नाशिक: वैभव कातकाडे
देशात फाइव्ह-जी तंत्रज्ञान विकसित झाले आहे. जिल्ह्यातील ग्रामीण तसेच आदिवासी भागात शिक्षण क्षेत्रातील वंचित घटकांना तंत्रज्ञानाच्या सकारात्मक वापरातून मुख्य प्रवाहात आणणार असल्याचे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) अशिमा मित्तल यांनी केले. दैनिक ‘पुढारी’सोबत खास बातचीत करताना त्यांनी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून विकासाचे अनेक मुद्दे आणि पैलू उलगडले.

मूळच्या जयपूरच्या असलेल्या अशिमा मित्तल या स्वतः आयआयटी पवईतून सिव्हिल अभियांत्रिकीतील पदवीधर आहेत. नागरी सेवेत येण्यापूर्वी त्या संगणक कंपनीत कार्यरत होत्या. लोककल्याणाच्या हेतूने भारतीय प्रशासकीय सेवेकडे आकर्षित झाल्या आणि त्यानंतर सनदी सेवेचा अभ्यास सुरू केला. 2015 मध्ये भारतीय राजस्व सेवा त्यानंतर 2016 मध्ये पुन्हा परीक्षा देऊन देशात 12 व्या क्रमांकाने उत्तीर्ण होऊन थेट प्रशासकीय सेवेत दाखल झाल्या. या सर्व प्रवासात आई-वडील व भावाचे खूप सहाय्य मिळाल्याचे त्या सांगतात.

नाशिकमध्ये पदभार मिळण्यापूर्वी त्या पालघर जिल्ह्यात सहायक जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत होत्या. आदिवासी विद्यार्थ्यांची शैक्षणिक पटावरील पीछेहाट बघून त्यांनी ‘एफएलएन-वेध’ म्हणजेच फाउंडेशन लिटरसी अ‍ॅण्ड न्यूमरसी हे अ‍ॅप विकसित केले. यामुळे प्रत्येक विद्यार्थ्याची सर्व माहिती एकत्रित करता आली. याचा फायदा संबंधित विद्यार्थ्याच्या सर्वांगीण विकासावर लक्ष ठेवण्यास झाला. याचाच वापर नाशिक जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये करणार असल्याचा मानस त्यांनी व्यक्त केला. प्रत्येक शाळेतील 10 विद्यार्थ्यांमागे एक ‘टॅब’ उपलब्ध करणार असल्याचे त्यांनी सांगितले. पालघरमध्ये आदिवासी विद्यार्थ्यांसाठी शासकीय शाळेमध्ये निवासी व्यवस्था करून देत दोनशे मुलांना स्पर्धा परीक्षांच्या प्रवाहात आणल्याचे त्यांनी सांगितले.

ग्रामीण विकासाला वाव
नाशिक जिल्हा हा वैविध्यपूर्ण आहे आणि त्यामुळेच तो कामासाठी प्रेरणादायी असल्यासोबतच आव्हानात्मकसुद्धा असल्याचे सांगतच त्यांनी या भागात ग्रामीण विकासाला मोठ्या प्रमाणात वाव असल्याचे सांगितले. भूसंपादन – वनहक्क आणि विकासात्मक मुद्यांवर कामाच्या द़ृष्टीने आपण भर देणार आहोत. केंद्र शासन किंवा राज्य शासन यांनी लोककल्याणासाठी केलेल्या योजनांचा लाभ समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्यासाठी सखोल अंमलबजावणी करणार असल्याचेदेखील त्यांनी यावेळी विशद केले.

हेही वाचा :

The post नाशिक : तंत्रज्ञानाधारे वंचित घटकांना प्रवाहात आणणार - जि. प. सीईओ अशिमा मित्तल appeared first on पुढारी.