नाशिक : तरंग आसनात त्यांनी गायला हरिपाठ

तरंग आसन www.pudhari.news

नाशिक (दिंडोरी ) : समाधान पाटील

भारतीय संस्कृतीमध्ये अनेक भक्ती साधनेला अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. त्यात ध्यानधारणा, समाधी, विविध स्वरूपांची आसने, विविध मंत्रांचे पठण या मार्गाने प्रत्येकजण साधना करून भगवंताची भक्ती करीत असतो. परंतु याही पलीकडे पाण्यावर तरंग आसनात संत ज्ञानेश्वर महाराजांचा हरिपाठ गावून भक्ती करतात ते तळवाडे (दिगर) गावाचे कृष्णा महाराज रौंदळ होय.

सध्या संत एकनाथ महाराज यांच्या पैठण येथे नाथषष्ठी मोठ्या उत्साहात सुरू आहे. येथील नाथसागरात असंख्य भाविक पवित्र स्नान करून देह पवित्र करतात. आतापर्यंत चार पायी नर्मदा परिक्रमा करून व आपल्या समाजप्रबोधनातून जनजागृती करणारे रौंदळ तळवाडेकर यांनी पैठणच्या नाथसागरात पाण्यावर तरंग आसन लावून चक्क ज्ञानोबारायांचा हरिपाठ खोल पाण्यावर तरंगून गायला व उपस्थित भाविक भक्तांना हरिपाठात काय भक्ती महिमा आहे, हे सिध्द करून दाखविले.  कृष्णा महाराज यांनी या तरंग आसनावर नर्मदा मातेच्या तीरावर ‘नर्मदे हर’ या भक्तिमय मंत्राचा उच्चार करून भाविक भक्तांची मने जिंकून घेतली. सध्या वयाची ६० वर्षे पूर्ण केलेली असताना तब्बल चार वेळा नर्मदा परिक्रमा, आळंदी, पंढरपूर, त्र्यंबकेश्वर, पैठण या क्षेत्रावरील असंख्य पायी वारी केल्या आहेत. तरंग आसनाबाबत ते म्हणतात की, पाण्यात पोहण्याची सवय लहानपणांपासून होती. परंतु ज्या दिवशी परमार्थाची सुरुवात गुरुमाउली कृष्णा माउली खायदेकर यांनी केली तेव्हापासून या तरंग आसनावर हरिपाठ गाण्याची सवय लागली. यामागे माझे सद्गुरू कृष्णा माउली खायदेकर यांचा मोठा आशीर्वाद आहे.

तरुणाईला संदेश

कृष्णा महाराज आजही मोठ्या प्रमाणावर वेगवेगळ्या स्वरूपांची आसने करतात. आसने, पायी वारी केल्याने आजही वयाची साठी पूर्ण करून त्यांना कुठल्याही प्रकारचा आजार नाही. पूर्णपणे निरोगी जीवन जगत आहेत. तरुणवर्गाला ते नेहमी व्यसनाधीन जीवन जगण्यापेक्षा विविध आसने, परामार्थाची कास धरा व आपले जीवन यशस्वी करा, असा संदेश देत असतात.

हेही वाचा:

The post नाशिक : तरंग आसनात त्यांनी गायला हरिपाठ appeared first on पुढारी.