नाशिक : .. तर अनधिकृत बांधकामांना अधिकारीच जबाबदार

नाशिक महानगरपालिका www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
शहरात ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणावर अतिक्रमणे तसेच अनधिकृत बांधकामे होऊनही त्याकडे मनपातील संबंधित अधिकारी आणि कर्मचार्‍यांकडून दुर्लक्ष होत असल्याने शहर बकाल होण्याची भीती व्यक्त होत आहे. परवानगी न घेताच अनधिकृत बांधकामे होत असल्याच्या तक्रारी येत असल्याने त्या अनुषंगाने संबंधित बांधकामे तसेच अतिक्रमणे तत्काळ हटविण्याचे निर्देश आयुक्तांनी अधिकार्‍यांना दिले आहेत. तसे न झाल्यास संबंधित अभियंत्यांसह विभागीय अधिकारी आणि अतिक्रमण निर्मूलन विभागाच्या अधिकार्‍यांना जबाबदार धरण्याचा इशाराच आयुक्तांनी दिला आहे.

महापालिका आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी विभागीय अधिकारी तसेच विभागप्रमुखांच्या बैठका घेत आढावा घेतला. बैठकीत अनधिकृत बांधकामाविषयी मुद्दे समोर आले. शहरात होत असलेल्या अनधिकृत बांधकामाबाबत नागरिकांच्या तक्रारी येत असल्याने त्यावर कारवाई केली जात नसल्याकडे त्यांनी लक्ष वेधले. नगर रचना आणि अतिक्रमण निर्मूलन विभागाकडून एकमेकांकडे बोट दाखविले जात असल्याने वेळकाढूपणा होत असल्याने आयुक्तांनी अधिकार्‍यांना फैलावर धरले. नाशिक शिवारातील भारतनगरच्या बाजूला असलेले अनधिकृत बांधकाम, गंगापूर रोडवरील आनंदवली शिवारातील महापालिकेच्या जागेवर केलेले अतिक्रमण या पार्श्वभूमीवर आयुक्तांनी बांधकामाची परवानगी देणार्‍या नगर रचना विभागासह अतिक्रमण निर्मूलन विभागाच्या अधिकार्‍यांना सूचना केल्या आहेत. महापालिकेच्या जागेवर तसेच रस्त्यांवर होणारे तसेच विनापरवानगी अनधिकृत बांधकाम व दिलेल्या परवानगीचे उल्लंघन करून होणार्‍या बांधकामांबाबत अधिकार प्रदान असलेल्या सर्व अधिकार्‍यांनी कारवाई करण्याचे आदेश त्यांनी दिले.

हेही वाचा:

The post नाशिक : .. तर अनधिकृत बांधकामांना अधिकारीच जबाबदार appeared first on पुढारी.