नाशिक : पुढारी वृत्तसेवा
तलाठी भरती परीक्षेत म्हसरूळ केंद्रावरील पेपरफुटीच्या प्रकाराबाबत पोलिसांनी संशयिताला ताब्यात घेत गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी आता जिल्हा प्रशासनानेही चौकशी करण्याचा निर्णय घेतला आहे.
राज्यभरात एकाचवेळी तलाठी भरतीसाठी निवड प्रक्रिया राबविण्यात येत आहे. त्यानुसार गुरुवारपासून (दि.१७) राज्यातील विविध केंद्रांवर आॅनलाइन पद्धतीने परीक्षा घेण्यात येत आहे. नाशिक जिल्ह्यात ११ केंद्रांवर पहिल्या टप्प्यातील परीक्षेला सुरुवात झाली. यादरम्यान म्हसरूळ येथील केंद्रावर पेपरफुटीचा प्रकार पुढे आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून संबंधितांना ताब्यातदेखील घेतले आहे. मात्र, महसूल विभागातील पदांसाठी ही परीक्षा प्रक्रिया राबविली जात आहे. त्यामुळेच जिल्हा प्रशासनही उपजिल्हाधिकारी संवर्गातील अधिकाऱ्यामार्फत या प्रकरणाची चौकशी करणार आहे.
ही परीक्षा खासगी एजन्सीद्वारे ऑनलाइन पध्दतीने घेतली जाते आहे. कॉपी प्रकरणातील आरोपींकडे सापडलेल्या प्रश्नपत्रिकांचे कथित स्क्रीन शॉट्स हे त्या विशिष्ट उमेदवाराला दिलेल्या प्रश्नांच्या संचाचा भाग होते की नाही, या आरोपीने कोणाशी संपर्क साधला होता याची माहिती संबंधित उपजिल्हाधिकारी घेतील. हे ‘पेपर लीक’चे प्रकरण आहे का तेदेखील शोधण्यात येणार असून, त्याचा अहवाल पुढील कारवाईसाठी राज्य सरकारकडे पाठविण्यात येईल, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र वाघ यांनी दिली.
हेही वाचा :
- राज्यातील तलाठ्यांना कार्यालयात उपस्थितीचे बंधन ! ग्रामपंचायतीला द्यावे लागणार उपस्थितीबाबत वेळापत्रक
- बारामती तालुक्याची दुष्काळी स्थितीकडे वाटचाल
- पुणे : यल्ल्याच्या भावाची टीप अन् म्हस्केचा ‘गेम’!
The post नाशिक : तलाठी पेपरफुटीची जिल्हा प्रशासन करणार चाैकशी appeared first on पुढारी.