नाशिक तापले! तापमानात कमालीची वाढ; नागरिक हैराण

नाशिक : मार्चच्या पहिल्याच आठवड्यापासून उन्हाच्या तीव्र झळा बसण्यास सुरवात झाली असून, दिवसागणिक वाढणाऱ्या तापमानामुळे नागरिक हैराण झाले आहेत. गेल्या काही वर्षांपासून नाशिककरांना मार्च महिन्यातच उन्हाच्या झळा सोसाव्या लागत असल्याचे चित्र आहे.

तापमानातही वाढ

नाशिकचे तापमान वाढले असून, तापमानाचा पारा बुधवारपासून ३० अंशांच्या वर गेला असून, उन्हाच्या झळा नाशिककरांना बसत आहेत. रविवारी (ता. २८) तापमानाची कमाल नोंद ३५.८, तर किमान तापमानातही वाढ होत पारा १६.१ अंशांवर पोचला आहे. 

हेही वाचा  - ''पुजा चव्हाणच्या मोबाईलवर संजय राठोड यांचे 45 मिस्डकॉल''; चित्रा वाघ यांचा नाशिकच्या पत्रकार परिषदेत दावा

उन्हाच्या झळांचा सामना
फेब्रुवारीपासूनच थंडगार पेयांची दुकाने रस्त्याच्या कडेला दिसायला लागली आहेत. काही दिवसांआधी थंडीचा कडाका अचानक वाढला होता. आता नाशिककर उन्हाचा तडाख्याचा अनुभव घेत असून, कमाल तापमानाबरोबरच किमान तापमानातही प्रचंड वाढ होताना दिसत आहे. शहरात दुपारी अकरापासूनच नागरिकांना उन्हाच्या झळांचा सामना करावा लागत असल्याचे दिसत आहे. शनिवारी तापमान ३५.५ अंशांवर पोचले होते. यात रविवारी वाढ होऊन ३५.८ अंशांवर पोचले आहे. पुढील काळात उष्णतेत आणखी वाढ होईल, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

हेही वाचा - अवघ्या चारच दिवसांवर बहिणीचं लग्न अन् लग्नघरातूनच निघाली अंत्ययात्रा; दुर्दैवी घटना

वातानुकूलित यंत्रणांची मागणी

गेल्या वर्षी लॉकडाउन असल्यामुळे सर्वजण घरीच असल्यामुळे उन्हाचा तडाखा बसला नाही. मात्र आता परिस्थिती सुरळीत असल्यामुळे नागरिकांना मार्चमध्येच उन्हाचा तडाखा बसणार असल्याचे चित्र आहे. गेल्या वर्षी लॉकडाउनमुळे वातानुकूलित यंत्रणांची मागणी मोठ्या प्रमाणावर घटली होती. मात्र यंदा मागणी वाढणार असल्याचे दिसत आहे.