Site icon

नाशिक : तारांगण पाडा प्रकरणी पाणी पिण्यास योग्य, मात्र साथीचे कारण गुलदस्त्यात

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
इगतपुरी तालुक्यातील तारांगण पाड्यावरील हातपंपांचे पाणी पिण्यास योग्य असल्याचा अहवाल भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेकडून जिल्हा परिषद प्रशासनास प्राप्त झाला आहे. जर पाणी पिण्यास योग्य आहे, तर मग साथीची लागण कशामुळे झाली, हा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे गेल्या आठवड्यात तारांगण पाड्यावरील 50 नागरिकांना गॅस्ट्रोची लागण कशामुळे झाली, याचे उत्तर शेवटी अनुत्तरितच राहिले आहे.

बाधित नागरिकांना नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात, तर काही नागरिकांना घोटीच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. गॅस्ट्रोची लागण झाल्यानंतर जिल्हा परिषद प्रशासन तसेच डॉक्टरांचे पथक तारांगण पाड्यावर त्वरित दाखल झाले होते. सर्व नागरिकांना औषधोपचारासह आवश्यक सूचनाही देण्यात आल्या. त्या ठिकाणी पथक चार दिवस तळ ठोकून होते. नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात दाखल 21 रुग्णांपैकी एकाचे निधन झाले. मात्र, त्याच्या शवविच्छेदन अहवालानुसार त्याचा मृत्यू अल्कोहोलमुळे झाल्याचे निष्पन्न झाले होते. अचानक ही कसली साथ आली, एवढ्या नागरिकांच्या जिवाला धोका का निर्माण झाला, याची उत्तरे शोधण्यासाठी तारांगण पाड्यावरील हातपंपांच्या पाण्याचे नमुने घेण्यात येऊन ते तपासणीसाठी उपविभागीय प्रयोगशाळा, घोटी (भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा) यांच्याकडे पाठविण्यात आलेे होते. नमुन्याच्या तपासणीनंतर पाणी पिण्यास योग्य असल्याचा अहवाल भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेकडून प्राप्त झाला.

हेही वाचा:

The post नाशिक : तारांगण पाडा प्रकरणी पाणी पिण्यास योग्य, मात्र साथीचे कारण गुलदस्त्यात appeared first on पुढारी.

Exit mobile version