नाशिक : तीन नायलॉन मांजाविक्रेतांना अटक

नायलॉन मांजा विक्रेत्यांना अटक,www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

दरवर्षीप्रमाणे यंदाही नायलॉन मांजा विक्रीवर आणि वापरावर बंदी कायम आहे. मात्र, नियम डावलून छुप्या पद्धतीने नायलॉन मांजाची सर्रास विक्री केली जात असल्याने पोलिसांकडून कारवाईचा फास आवळला जात आहे. गुन्हे शाखा युनिट दोनच्या पथकाला तीन नायलॉन मांजा विक्रेत्यांच्या मुसक्या आवळण्यात यश आले.

चेतन रघुनाथ जाधव (२६, रा. भगतसिंग चौक, लोकमान्यनगर, सिडको), अजय भारत कुमावत (२३, रा. लोकमान्यनगर, सिडको) व कन्हैयालाल किशनचंद शर्मा (४२, रा. सिंधी कॉलनी, उपनगर) अशी संशयितांची नावे आहेत. मकर संक्रांत सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. संक्रांतीनिमित्त मोठ्या प्रमाणात पतंगबाजी केली जाते. मात्र, त्यासाठी वापरण्यात येणारा नायलॉन मांजा प्राण्यासह मानवी जीवितास धोकादायक आहे. या पार्श्वभूमीवर नायलॉन मांजा विक्रीविरोधात पोलिसांनी कारवाईचा धडाका लावला आहे. मिळालेल्या माहितीच्या आधारे गुन्हे शाखा दोनच्या पथकाने उपनगर परिसरात कारवाई करीत संशयित शर्माकडून ११ हजार रुपये किमतीचा नायलॉन मांजा हस्तगत केला, तर संशयित जाधव व कुमावत या दोघांकडून २५ हजार ६०० रुपये किमतीचे नायलॉन मांजाचे ४२ गट्टू जप्त केले आहेत.

दोन्ही गुन्ह्यांतील तीन संशयितांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून ३६ हजार ६०० रुपये किमतीचे नायलॉन मांजाचे ६२ गट्टू हस्तगत केले आहेत. पाेलिस आयुक्त अंकुश शिंदे, उपआयुक्त प्रशांत बच्छाव, सहायक पोलिस आयुक्त वसंत मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक आनंदा वाघ, उपनिरीक्षक पोपट कारवाळ, सहायक पोलिस उपनिरीक्षक राजाराम वाघ, हवालदार प्रकाश भालेराव, अनिल लोंढे, शंकर काळे, चंद्रकांत गवळी, नंदकुमार नांदुर्डीकर, गुलाब सोनार, सुनील आहेर, प्रशांत वालझाडे, राहुल पालखेडे आदींनी कारवाईत सहभाग घेतला.

हेही वाचा :

The post नाशिक : तीन नायलॉन मांजाविक्रेतांना अटक appeared first on पुढारी.