नाशिक ते हैद्राबाद, बेंगलुरु, दिल्ली हवाई सेवेला प्रारंभ;पहिल्याचं दिवशी ८० टक्के बुकींग

नाशिक : देशातील महत्वाच्या शहरांना विमानसेवेने जोडण्याचे नाशिककरांचे स्वप्न आज काही अंशी पुर्ण झाले. स्पाईस जेट कंपनीने ओझर विमानतळावरून हैद्राबाद, बेंगलुरु व दिल्ली या महत्वाच्या शहरांना जोडणाया सेवेला आजपासून प्रारंभ केला. पहिल्याचं दिवशी ८० टक्के बुकींग झाल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले.  

दिल्ली, हैद्राबाद, बेंगलुरु या सेवेला सुरुवात

पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या प्रयत्नातून संरक्षण विभागाच्या अखत्यारीत असलेल्या एचएएल च्या विमानतळावर सुमारे ६५ कोटी रुपये खर्च करून एअर टर्मिनलची उभारणी करण्यात आली होती. सुरुवातीला डेक्कन कंपनीने नाशिक-मुंबई, नाशिक-पुणे हवाई सेवा सुरु केली परंतू प्रतिसादा अभावी सेवा बंद करण्यात आली त्यानंतर केंद्र सरकारच्या उडान योजनेंतर्गत दिल्ली-नाशिक सेवा सुरु झाली. कालांतराने ती सेवा देखील बंद करण्यात आली होती. गेल्या वर्षभरापासून अलायन्स एअर कंपनी मार्फत नाशिक ते अहमदाबाद, हैद्राबाद व दिल्ली हि सेवा तसेच ट्र् जेट कंपनीची नाशिक-अहमदाबाद हि सेवा लॉकडाऊनचा काळ वगळता निरंतर सुरु आहे. त्यात आता स्पाईस जेट कंपनीच्या सेवेची भर पडली. आज पासून दिल्ली, हैद्राबाद, बेंगलुरु या सेवेला सुरुवात झाली. 

हेही वाचा > मामाने वाचवले पण नियतीने हिरावले! चिमुकल्या जयाची मृत्युशी झुंज अपयशी

नाशिकच्या विकासाला चालना 
बेंगलुरु, हैदराबाद व राजधानी दिल्ली हि शहरे नाशिकला हवाई सेवेने जोडली गेल्याने आनंद आहे. या माध्यमातून उद्योग, व्यवसाय व पर्यटनाला चालना मिळून रोजगार निर्मिती होईल. विमानसेवा निरंतर सुरु राहणे आवशक्य आहे. विमानसेवेमुळे शेती उत्पादनाला आंतरराष्ट्रीय बाजारपेठ उपलब्ध होईल. - छगन भुजबळ (पालकमंत्री नाशिक) 

हेही वाचा > मोकाट कुत्र्याच्या तावडीत इवलेसे बिथरलेले पाडस; युवकांनी दिले जीवदान

 
नाशिक देशातील प्रमुख शहराशी जोडले गेल्याने कनेक्टिव्हिटी बळकट होणार आहे. विमानसेवा सुरु करण्याच्या प्रयत्नांच्या पाठपुराव्याला यश आल्याचे समाधान आहे. - हेमंत गोडसे (खासदार ) 

 

अशी वेळ असे दर 
हैद्राबाद येथून सकाळी १०.३५ वाजता नाशिककडे उड्डाण होईल. दुपारी १२ वाजून पाच मिनिटांनी ओझर विमानतळावर पोहोचेल. ओझरहून दुपारी १२.३५ वाजता हैद्राबादकडे उड्डाण झाल्यानंतर दुपारी दोन वाजून पाच मिनिटांनी पोहोचेल. बेंगलुरु वरून सकाळी ११.२० वाजता ओझरकडे उड्डाण होईल. दुपारी १२.२५ वाजता पोहोचेल. नाशिक हून १२.५५ वाजता बेंगलुरु कडे उड्डाण होईल. दुपारी दोन वाजून पाच मिनिटांनी पोहोचेल. २५ नोव्हेंबर पासून दिल्ली सेवा सुरु होईल. दुपारी तीन वाजून पंधरा मिनिटांनी ओझरकडे उड्डाण होईल. संध्याकाळी पाच वाजून पाच मिनिटांनी पोहोचेल. संध्याकाळी पाच वाजून ३५ मिनिटांनी दिल्लीकडे उड्डाण होईल. सात वाजून २५ मिनिटांनी दिल्लीत पोहोचेल. तीन ते चार हजार रुपये हवाई सेवेचे दर राहतील. 

 

ओझर विमानतळावर एका कार्यक्रमात पालकमंत्री भुजबळ यांनी सेवेला झेंडा दाखविला. खासदार हेमंत गोडसे, आमदार दिलीप बनकर, प्रांताधिकारी संदीप आहेर, मिग कॉम्प्लेक्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी बी.एच. वी. शेषगिरी राव, एचएएलचे जनरल मॅनेजर दीपक सिंगल, साकेत चतुर्वेदी आदी उपस्थित होते.