नाशिक : तोंडावर दिवाळी, पिकांना मारक ठरतोय अवकाळी

पिंपळगाव मोर www.pudhari.news

नाशिक (पिंपळगाव मोर) : नीलेश काळे
खरीप हंगाम सरून रब्बी हंगामास प्रारंभ झाला असून रब्बीच्या लागवडीस सुरुवात होत आहे. साधारणपणे दसरा-दिवाळीवेळी खरीप हंगामाच्या पिकांची काढणी होत असते. इगतपुरी तालुक्यातील सर्वच भागात भात, सोयाबीन, नागली, वरई आदी पिके काढणीला आली आहेत.

भात पिकांतील निमगरी, हाळी आदी सर्वच वाण काढणीसाठी आले असून पावसामुळे विलंब होत आहे. परतीच्या अवकाळी पावसाने ओहोळ-नाले पून्हा पूर्ण क्षमतेने भरून वाहू लागले आहेत. ढगफुटीसदृश पावसाने भात पिके आडवी झाली आहेत. भातखाचरे पुर्णतः भरले असून काठोकाठ पाणी आहे. भात पीक आडवे झाल्याने धान कुजणार आहेच शिवाय जनावरांसाठीचा पेंढादेखील सडणार आहे. एकंदरीत भात पिकाचे उत्पादन घटणार असून शेतकरी चिंतातुर झाला आहे. इगतपुरीच्या जिराईत जमिनीवर तसेच माळरानावर होणार्‍या सोयाबीन पिकाच्या शेंगा देखील ऊन-पावसाने तडकून सोयाबीन उडून पडू लागली आहे. काही ठिकाणी तर शेंगा काळ्या पडू लागल्या आहेत. भात, सोयाबीन पिकाची अवस्था सारखीच असल्याने व दिवाळी सण तोंडावर आल्याने सण कसा साजरा करायचा हा पेच शेतकर्‍यांना पडला आहे.

ऐन सणासुदीच्या काळात खरिपाच्या पहिल्या टप्प्यातील पीक निघत असते. यंदा मात्र अवकाळीने बेजार केले असून हातचे पीक जाण्याची वेळ आली आहे. पंचनामे करून भरपाई व पीकविमा मंजूर करण्यात यावा. – संतोष वारुंगसे, बेलगाव तर्‍हाळे.

हेही वाचा:

The post नाशिक : तोंडावर दिवाळी, पिकांना मारक ठरतोय अवकाळी appeared first on पुढारी.