नाशिक : “त्या” आश्रमशाळेची मान्यता रद्द करा – अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद

आदिवासी www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

जोपूळ (ता. दिंडोरी) येथील यशवंत पाटील एज्युकेशन सोसायटी संस्था संचलित आश्रमशाळेतील इयत्ता सहावीत शिक्षण घेणारा विद्यार्थी संकेत ज्ञानेश्वर गालट (११, रा. सावर्णा, ता. पेठ) याचा निव्वळ पोटात दुखण्याच्या कारणावरुन दुदैवी मृत्यू झाला. प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळेच गालट याचा मृत्यू झाला असून, याप्रकरणी दोषी कर्मचाऱ्यांसह संस्थेची मान्यता रद्द करा, अशी मागणी अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेने निवेदनाद्वारे केली आहे.

जोपूळ येथील प्राथमिक आश्रमशाळेतील मुख्याध्यापिका संध्या भास्कर साखरे, शिक्षक भरत रमाकांत गुळवे व अधिक्षक एकनाथ दाजी भामरे यांच्या निष्काळजीपणामुळे संकेत गालट याला जीव गमवावा लागला. गेली पंधरा दिवस संकेत आजारी असतानाही त्याला रूग्णालयात दाखल करण्यात आले नाही. वेळीच उपाचार मिळाले असते तर संकेतचा जीव वाचला असता. या प्रकरणी तिघांचे संस्थेने तात्काळ निलंबन केले असून, त्यांच्या मान्यतेचे प्रस्तावही अपर आयुक्त कार्यालयाकडे पाठविण्यात आला आहे. प्रस्तावावर तत्काळ अमंलबाजवणी करण्याची मागणी निवेदनात करण्यात आली आहे. विविध मागण्यांचे निवेदन उपायुक्त सुदर्शन नागरे यांना देण्यात आले. यावेळी परिषदेचे प्रदेश युवाध्यक्ष लकी जाधव, कार्याध्यक्ष गणेश गवळी, सोनू गायकवाड, मोहन खाडे, सागर खेताडे, भाऊसाहेब बेंडकुळे आदी उपस्थित होते.

मुख्यध्यापिकेसह तिघांचे निलंबन
आदिवासी विद्यार्थ्याच्या मृत्यूची संस्थेने गंभीर दखल घेत मुख्याध्यापिका संध्या भास्कर साखरे, शिक्षक भरत रमाकांत गुळवे व अधिक्षक एकनाथ दाजी भामरे यांना तात्काळ निलंबित केले आहे. तसेच हलगर्जीपणा केल्याप्रकरणी मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याचे पत्र पोलिसांना देण्यात आले आहे. तर तिघांची मान्यता रद्द करण्याचा प्रस्ताव अपर आयुक्तांकडे पाठविण्यात आला आहे.

हेही वाचा:

The post नाशिक : “त्या” आश्रमशाळेची मान्यता रद्द करा – अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद appeared first on पुढारी.