नाशिक : ‘त्या’ घटनेनंतर नाशिक जिल्ह्यातील धोकादायक पर्यटनस्थळांवर पुन्हा बंदी

नाशिक पर्यटनस्थळांवर बंदी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
पु्ढील तीन दिवस हवामान खात्याने दिलेला ऑरेंज अलर्ट आणि दुगारवाडी (ता. त्र्यंबकेश्वर) येथे रविवारी (दि. 7) मध्यरात्री पर्यटक अडकल्याच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील धोकादायक पर्यटनस्थळांवर पुढील तीन दिवस पर्यटकांना बंदी घालण्यात आली आहे. सर्व तहसीलदार व वनविभागाला तसे आदेश देण्यात आले आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांनी दिली आहे.

राज्यात पावसाने दमदार पुनरागमन केले आहे. तसेच नाशिक जिल्ह्यात मागील दोन दिवसांपासून त्याचा जोर वाढला आहे. त्यातच त्र्यंबकेश्वर तालुक्यातील दुगारवाडी धबधबा पर्यटनासाठी गेलेले 23 पर्यटक रविवारी (दि. 7) संततधारमुळे अडकून पडले होते. त्यातील 22 पर्यटकांना वाचविण्यात यंत्रणांना यश आले असून, पुराच्या पाण्यात वाहून गेल्याने 40 वर्षीय पर्यटकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. अडकलेल्या पर्यटकांची सुटका प्रशासनाने स्थानिकांच्या मदतीने मध्यरात्री पावणेदोनला केली. जिल्ह्यातील पावसाचा जोर कायम आहे. पुढील तीन दिवस जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. मंगळवार (दि. 8) पासून पुढील तीन दिवस ही सर्व स्थळे बंद ठेवण्याचा निर्णय जिल्हाधिकार्‍यांनी घेतला आहे.

हवामान विभागाने जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता आहे. त्यातच दुगारवाडीत पर्यटक अडकल्याची व एकाचा मृत्यू झाल्याची घटना ताजी आहे. अडकलेल्या पर्यटकांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. पुढील तीन दिवस जिल्ह्यातील धबधबे व धोकेदायक पर्यटन स्थळांवर पर्यटनास बंदी घालण्याचे आदेश तहसीलदार आणि वनविभागाला दिले आहेत. -गंगाथरन डी., जिल्हाधिकारी, नाशिक.

हेही वाचा :

The post नाशिक : 'त्या' घटनेनंतर नाशिक जिल्ह्यातील धोकादायक पर्यटनस्थळांवर पुन्हा बंदी appeared first on पुढारी.