नाशिक : ‘त्या’ शिक्षकांची चौकशी, मासिक पाळीमुळे विद्यार्थिनीस वृक्षारोपणास मज्जाव

वृक्षलागवड

देवगाव : (जि. नाशिक) पुढारी वृत्तसेवा
त्र्यंबकेश्वर तालुक्यातील देवगाव कन्या शासकीय आश्रमशाळेत इयत्ता बारावी विज्ञान शाखेत शिकणार्‍या विद्यार्थिनीस मासिक पाळीच्या कारणास्तव शिक्षकानेच वृक्षारोपण करण्यास रोखल्याच्या खळबळजनक घटनेची प्रशासनाने गंभीर दखल घेत बुधवारी (दि. 27) सकाळी एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकारी वर्षा मीना यांनी आश्रमशाळेस भेट देत चौकशी सुरू केली.

महाराष्ट्र महिला आयोगाने या प्रकरणी तातडीने कार्यवाही करून वस्तुस्थितीदर्शक अहवाल राज्य महिला आयोगास पाठविण्याचे निर्देश चाकणकर यांनी दिले होते. त्यानुसार मीना यांनी मुख्याध्यापक, महिला अधीक्षिका, कर्मचारीवर्ग, संबंधित शिक्षकांची चौकशी केली तसेच पीडित विद्यार्थिनीचे म्हणणे नोंदवून घेतले. या प्रकरणाचा तपास सुरू असून, या शाळेमधील शिक्षकांचा जबाब नोंदवून घेतल्याचे वर्षा मीना यांनी सांगितले.

चौकशी समितीने संबंधित विद्यार्थिनीची, शिक्षकांची कसून चौकशी केली आहे. तसेच तिच्या वर्गातील सर्व विद्यार्थिनींची सखोल चौकशी करून त्यांच्याकडून लेखी अहवाल ते घेऊन गेले आहेत. त्या अहवालावरून पुढील दिशा ठरवतील. ती जी दिशा असेल त्याच्यामध्ये हस्तक्षेप करण्याचा अधिकार आम्हाला नाही, असे मुख्याध्यापक अरविंद सुरवाडे यांनी स्पष्ट केले. पुरोगामी विचारांच्या महाराष्ट्रात अंधश्रद्धेला खतपाणी घातल्या जाणार्‍या निंदनीय व घृणास्पद घटनेचा सर्वच स्तरातून निषेध व्यक्त केला जात आहे. मात्र, वर्गस्तरावर आठ ते दहा वृक्षांचा छोटेखानी वृक्षलागवडीचा कार्यक्रम घेण्यात आला होता. त्यावेळी ही विद्यार्थिनी गैरहजर असल्याचे शाळा प्रशासनाने बुधवारी सांगितले.

हा प्रकार मी कोणाच्याही सांगण्यावरून व दबावावरून सांगत अथवा बोलत नसून माझ्याबाबत झालेली गोष्ट सांगत आहे. – पीडिता

काय आहे नेमके प्रकरण?
विद्यार्थिनीने केलेल्या तक्रारीनुसार साधारण दोन ते तीन आठवड्यांपूर्वी शाळेतील शिक्षकाने विद्यार्थिनीला ज्यांची मासिक पाळी सुरू असेल त्या विद्यार्थिनीने झाड लावू नये. नाही तर हे झाड जळून जाईल. मासिक पाळीचा आणि वृक्षारोपणाचा काहीही संबंध नसताना केवळ अंधश्रद्धेपोटी शिक्षकाने अशा प्रकारे बाजूला ठेवल्याने विद्यार्थिनीने या प्रकाराची तक्रार घरच्यांकडे केली.

सातच दिवस उपस्थिती
यंदा शैक्षणिक वर्ष 15 जूनला सुरू झाल्यापासून सदर विद्यार्थिनी 38 दिवसांपैकी फक्त सातच दिवस हजेरी पत्रकावरून उपस्थित असल्याचे दिसत असल्याचे शाळा प्रशासनाने म्हटले

हेही वाचा :

The post नाशिक : 'त्या' शिक्षकांची चौकशी, मासिक पाळीमुळे विद्यार्थिनीस वृक्षारोपणास मज्जाव appeared first on पुढारी.