नाशिक : त्र्यंबक तीर्थस्थळी दु: खाचे सावट; बस उलटल्याने झालेल्या अपघातातील जखमी जिल्हा रुग्णालयात दाखल

त्र्यंबकेश्वर अपघात www.pudhari.news

नाशिक (त्र्यंबकेश्वर) : पुढारी वृत्तसेवा

ञ्यंबकेश्वरला तीर्थपर्यटनाला आलेल्या बुलडाणा येथील भाविकांची बस ब्रह्मगिरीनजीकच्या उतारावर वाहनचालकाचे नियंत्रण सुटल्याने बस उलटून अपघातात १५ भाविक जखमी झाले. सर्व जखमींना ञ्यंबकेश्वर उपजिल्हा रुग्णालयात प्रथमोपचार करून पुढील उपचारासाठी नाशिक जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.

बुलडाणानजीकच्या चांडोल गावातील 29 भाविक ञ्यंबकेश्वरला सोमवारी सकाळी देवदर्शनासाठी आले होते. त्र्यंबकेश्वर मंदिर दर्शनासाठी बंद असल्याने सर्व भाविक ब्रह्मगिरी पर्वतावर फिरण्यासाठी गेले. ब्रह्मगिरी पर्वतावरील गोदावरी जन्मस्थान आणि मंदिरातील देवदर्शन आटोपून दुपारी १च्या सुमारास खाली उतरून आले. ब्रह्मगिरी पायथ्याशी उभ्या असलेल्या बसमधून ते निघाले असता पर्यटन केंद्राच्या उतारावर बसचालकाचे नियंत्रण सुटल्याने तेथील वळणावर बस थेट महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या संस्कृती रिसॉर्टच्या प्रवेशव्दाराजवळ असलेल्या नाल्यात गेली. तेथे एका झाडावर बस आदळली आणि उलटली.

अपघातानंतर हरित ब्रह्मगिरी संस्थेचे ललित लोहगावकर, प्रकाश दिवे, कैलास देशमुख, गौरव पवार यांसह दिनेश नाईकवाडी आणि अन्य उपस्थितांनी बसच्या काचा फोडून १३ जखमी प्रवाशांना बाहेर काढले. यावेळेस उपस्थितांनी 108 क्रमांकाच्या रुग्णवाहिकेला वारंवार दूरध्वनी केला, मात्र प्रतिसाद मिळाला नाही. ञ्यंबकेश्वर देवस्थानने तातडीने रुग्णवाहिका पाठविली. पोलिस निरीक्षक संदीप रणदिवे यांनी आपल्या सर्व सहकाऱ्यांसह घटनास्थळावर धाव घेऊन बचाव कार्य सुरू केले. तसेच नगरपालिका कर्मचारी नितीन शिंदे आणि त्यांचे सहकारी यांनी काही खासगी वाहनांनी जखमींना जिल्हा रुग्णालयात पोहोचवले. तेथे अधीक्षक डॉ. मंदाकिनी बर्वे, डॉ. भागवत लोंढे आणि सर्व सहकाऱ्यांनी तातडीने जखमींवर उपचार सुरू केले. रुग्णालयात नगरसेवक सागर उजे, विश्वस्त भूषण अडसरे यांसह ग्रामस्थांनी धाव घेऊन मदत केली. काही जखमींची प्राणवायूची पातळी खालावल्याने ऑक्सिजनसह असलेल्या रुग्णाहिकांमधून नाशिक जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले.

जखमी भाविकांमध्ये यांचा समावेश :   बसचालक गौतम वाघुळे (वय 28), भाविक प्रवासी शांताबाई आहेर (वय 70), मंगलसिंग भखड (वय 55), लक्ष्मीबाई उसारे (वय 70), मेनका उसारे (वय 35), शांताबाई मुराडे (वय 66), भिकाबाई मुराडे (वय 50), प्रेमसिंग पाकड (वय 55), रतनसिंग धनावट (वय 65), वत्सलाबाई तीठे (वय 70), अर्जुन पाकड (वय 11), छायाबाई धनावट (वय 59), तापाबाई राजपूत (वय 55), प्रेमसिंग पाकड (वय 70), काशीबाई उसारे (वय 60).

झाडामुळे बचावले प्राण
नाल्यात झाड नसते तर थेट नाल्यात घुसलेली बस नाला ओलांडून समोरच असलेल्या शाळेच्या आवारात गेली असती. तसेच या उतारावर त्यावेळेस दुचाकी अथवा अन्य वाहन रस्त्यावर समोर असते तर मोठा अनर्थ झाला असता. परंतु झाडामुळे प्राण बचावल्याची भावना बचावलेल्या प्रवाशांनी व्यक्त केली.

हेही वाचा:

The post नाशिक : त्र्यंबक तीर्थस्थळी दु: खाचे सावट; बस उलटल्याने झालेल्या अपघातातील जखमी जिल्हा रुग्णालयात दाखल appeared first on पुढारी.