
नाशिक (कवडदरा) : पुढारी वृत्तसेवा
कडाक्याच्या थंडीने जनावरांनाही हाल सोसावे लागतात. सध्या इगतपुरी तालुक्यातील कवडदरा, साकूर, घोटी खुर्द, शेणित, पिंपळगाव डुकरा परिसरात कडाक्याची थंडी, सतत बदलणारे वातावरण आणि लम्पीची साथ यामुळे दूध उत्पादन घटण्याची भीती पशुपालक शेतकऱ्यांना वाटत आहे.
जनावरांना गेल्या काही महिन्यांपासून लम्पी आजाराने ग्रासले आहे. यातून कसेबसे सावरण्याचा प्रयत्न झाला असतानाच वातावरणात अचानक बदल झाले. काही दिवस ढगाळ वातावरण, काही भागांमध्ये तुरळक पावसानेही हजेरी लावली. महिनाभरापासून कडाक्याची थंडी पडत आहे. या वातावरण बदलाचा जनावरांवर परिणाम होत आहे. कडाक्याच्या थंडीमुळे गुरांना विविध आजारांची लागण होण्याची भीती आहे. लम्पीतून सावरलेल्या गुरांना विषाणूजन्य आजारांनी विळखा घातला तर जनावरांना मृत्यूचा सामना करावा लागेल, अशी भीती शेतकऱ्यांना सतावत आहे. तसे झाले तर दूध उत्पादनावर मोठा परिणाम होणार आहे. लम्पी व इतर आजारांमुळे दूध उत्पादनावर परिणाम झालेला आहे. लम्पी आजारामुळे गुरांवर तोंडखुरी व पायखुरी आजारांचा हल्ला होतो. यात जनावरे चारा-पाणी बंद करतात. त्याचा थेट परिणाम दूध उत्पादनावर होतो. थंडी अशीच वाढत राहिली तर उत्पादन घटण्याची शक्यता आहे. दरवर्षी थंडीमुळे राज्यातील दूध उत्पादनात २० ते ३० टक्क्यांनी घट होते, असे पशुवैद्यक अधिकारी शरद देशमुख यांनी सांगितले. जनावरांना लम्पीची लागण झाल्यास किंवा विषाणूजन्य आजाराने विळखा घातल्यास संबंधित जनावरांचे विलगीकरण करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.
दोनच महिने काळजीचे…
दरवर्षी जानेवारी आणि फेब्रुवारी हे दोनच महिने जनावरांची विशेष काळजी घ्यावी लागते. एकतर कडाक्याची थंडी याच कालावधीत पडते. त्यामुळे अनेक विषाणूजन्य आजारांचा जनावरांना विळखा बसतो. या कालावधीत अशा आजारांची साथच असते.
हेही वाचा:
- Uddhav Thackeray vs Eknath Shinde: ‘धनुष्यबाण’ चिन्हाबाबत पुढील सुनावणी शुक्रवारी
- पुणे: पालखी महामार्गामुळे अनेकांच्या स्वप्नातील घरे पूर्ण, शेतकर्यांना भूसंपादित जमिनीमुळे लाखोंचा मोबदला
- पुणे: लवळे फाटा येथील रस्त्याचे काम सुरू, सहा महिन्यांपासून बंद होते पुणे दिघी बंदर रस्त्याचे काम
The post नाशिक : थंडी, लम्पीमुळे दूध आटलं; पशुपालकांमध्ये चिंता appeared first on पुढारी.