नाशिक : थकबाकी न भरणाऱ्यांचे नळकनेक्शन तोडण्याचा इशारा

जल

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

मनपा पाणीपट्टी वसुलीचे उद्दिष्ट ७५ कोटी आहे. तर दुसरीकडे डिसेंबरअखेर आतापर्यंत अवघ्या ३५ कोटींची पाणीपट्टी वसूल झाली आहे. वसुलीचे हे प्रमाण ५० टक्क्यांपेक्षा कमी असल्यामुळे मनपाने थकबाकी वसुलीकरिता थकबाकी न भरणाऱ्यांचे नळकनेक्शन तोडण्याचा इशारा दिला आहे.

नाशिक शहरात सुमारे दोन लाख नळकनेक्शन आहेत. यापैकी २५ हजार व्यावसायिक नळकनेक्शन असून, १२ हजार ५७१ व्यावसायिक नळकनेक्शनधारकांनी पाणीपट्टी न भरल्याने आयुक्तांनी संंबंधितांचे व्यावसायिक नळकनेक्शन तोडण्याचे आदेश दिले आहेत. गेल्या दोन वर्षांपासून कोरोना महामारीमुळे महापालिकेच्या करवसुलीवर परिणाम झाला आहे. जीएसटीनंतर महापालिकेच्या उत्पन्नाचे प्रमुख स्त्रोत म्हणून घरपट्टी, पाणीपट्टीकडे पाहिले जाते. त्यामुळे हा कर वसूल करण्याकरता मनपाने नळकनेक्शनच तोडण्याचा इशारा दिला आहे. १८० कोटींची घरपट्टी वसुलीसाठी मनपाच्या कर आकारणी विभागाने ७६ हजार मिळकतधारकांना नोटिसा बजावल्या आहेत. यानंतर आता पाणीपट्टी थकबाकीदारदेखील मनपाच्या रडारवर आले आहेत.

आयुक्तांच्या निर्देशानुसार विविध कर विभागाने पाणीपट्टीचा भरणा न करणाऱ्या १२ हजार ५७१ नळकनेक्शनधारकांची यादी तयार केली असून, संबंधितांनी पाणीपट्टी न भरल्यास नळकनेक्शन तोडले जाणार आहे. त्याकरिता मनपा कर विभागाला प्लंबर्सची आवश्यकता लागणार असल्याने आयुक्तांनी पाणीपुरवठा विभागाकडून प्लंबर्स उपलब्ध करून देण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार आता कर विभागाने पाणीपुरवठा विभागास प्लंबर्स उपलब्ध करून देण्याबाबतचे पत्र सादर केले आहे.

हेही वाचा :

 

The post नाशिक : थकबाकी न भरणाऱ्यांचे नळकनेक्शन तोडण्याचा इशारा appeared first on पुढारी.