नाशिक: थकीत कर्जप्रकरण : अद्वय हिरे यांना ५ दिवसांची पोलीस कोठडी

Advay Hire

मालेगाव मध्य : पुढारी वृत्तसेवा: रेणुकादेवी सूतगिरणी संस्थेसाठी नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून घेतलेले कर्ज थकविल्याप्रकरणी बँकेने शहरातील रमजानपुरा पोलीस ठाण्यात उद्धव ठाकरे गटाचे उपनेते डॉ. अद्वय हिरे यांच्यावर गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणी डॉ. हिरे यांना मालेगाव येथील अपर जिल्हा सत्रन्यायालयात हजर केले असता त्यांना न्यायाधिश एस. व्ही. बघेले यांनी सोमवार (दि.२०) पर्यंत पोलीस कोठडी सुनावली. (Advay Hire)

डॉ. हिरे यांनी नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून २०१२ साली मालेगाव येथील रेणूकादेवी सूत गिरणी संस्थेसाठी घेतलेले ३ कोटी ४० लाखांचे कर्ज थकविले होते. यासाठी गहान ठेवलेल्या मिळकतीवरच वेळोवेळी कोटींचे कर्ज काढले गेले. या प्रकरणात हिरे यांच्याकडे बँकेचे एकूण ३५ कोटी ९० लाख रुपयांचे कर्ज थकले होते. सदर कर्ज थकविल्याप्रकरणी डॉ. हिरे यांचे सह इतरांवर मालेगाव शहरातील रमजानपुरा पोलीस ठाण्यात बँकेने फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. (Advay Hire)

या गुन्हयात डॉ. हिरे यांनी मालेगाव येथील न्यायालयात अटकपूर्व जामीन मिळण्यासाठी अर्ज दाखल केला होता. मात्र, सदर अर्ज न्यायाधीश बघेले यांच्या न्यायालयाने फेटाळला होता.

त्यामुळे डॉ. हिरे यांनी उच्च न्यायालयात जामीनासाठी धाव घेतली होती. उच्च न्यायालयानेही त्यांचा जमीन अर्ज फेटाळला होता. तेव्हापासून डॉ. हिरे फरार होते. दरम्यान, बुधवार दि.१५ रोजी पहाटे ४ वाजेच्या सुमारास डॉ. हिरे यांना भोपाळ येथून नाशिक ग्रामीण पोलीस व आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली होती. त्याच रात्री डॉ. हिरे यांना मालेगाव तालुका पोलीस ठाण्यात आणण्यात आले. त्यानंतर त्यांना रात्रभर कारागृहात ठेवण्यात आले. गुरूवारी (दि.१६) सकाळी १०.३० च्या दरम्यान डॉ. हिरे यांना पोलीस बंदोबस्तात मालेगाव न्यायालयात आणण्यात आले.

हिरे यांच्यावर राजकिय द्वेषापोटी पाच वर्षानंतर गुन्हा दाखल करण्यात आला असल्याने त्यांचा जामीन मंजूर करण्यात यावा, असा युक्तीवाद डॉ. हिरे यांचे वकील अॅड. एम. वाय. काळे यांनी केला. तर डॉ. हिरे यांनी बँकेची फसवणूक केली आहे. यातील डॉ. हिरे हे मुख्य सुत्रधार आहेत. त्यांच्या माध्यमातून आर्थिक फायदा कोणाला झाला. त्या कर्जाची रक्कम कोठे वापरली, याचा तपास व्हावा, यासाठी त्यांना पोलीस कोठडी देण्यात यावी, असा युक्तीवाद बँकेचे वकील अॅड. ए. आय. वासिफ यांनी केला. यावेळी सरकारी वकिल फुलपगारे व आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राहुल कचरे यांनी देखील युक्तीवाद केला. दोन्ही पक्षाच्या युक्तीवादानंतर न्या. बघेले यांनी डॉ. हिरे यांना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.

हेही वाचा 

The post नाशिक: थकीत कर्जप्रकरण : अद्वय हिरे यांना ५ दिवसांची पोलीस कोठडी appeared first on पुढारी.