नाशिक : ‘दक्षता’ची सूत्रे कंत्राटींच्या हाती

मालिका www.pudhari.news

नाशिक : नितीन रणशूर
अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समिती नाशिक एक व नाशिक दोनच्या दक्षता पथकांची सूत्रे सध्या कंत्राटी अधिकार्‍यांच्या हाती आहे. दोन्ही दक्षताला पुरेसे मनुष्यबळ नसल्याने नाशिक आणि अहमदनगर जिल्ह्यांतील सुमारे 1,100 प्रस्ताव धूळखात पडून आहेत. त्यामध्ये नाशिक एकच्या 400, तर नाशिक दोनच्या 700 प्रस्तावांचा समावेश आहे. समितीकडून प्रस्ताव निकाली काढण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली जात असताना दक्षतामुळे प्रलंबित प्रस्तावांचा फुगवटा निर्माण झाला आहे.

राज्यात अनुसूचित जमाती प्रवर्गातील जातवैधता प्रमाणपत्र पडताळणीसाठी आदिवासी विकास विभागाच्या अंतर्गत औरंगाबाद, अमरावती, गडचिरोली, नागपूर, नंदुरबार, नाशिक, पुणे, ठाणे आदींसाठी 9 स्वतंत्र समित्या कार्यरत आहेत. या समित्यांच्या कामकाजाचे समन्वय आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था (पुणे) यांच्या माध्यमातून केले जाते. या समित्यांमध्ये पोलिस विभागाचे दक्षता पथकही कार्यरत आहे. पोलिस उपअधीक्षक, पोलिस निरीक्षक व पोलिस शिपाई ही 3 पदे या दक्षता समितीवर असतात. मात्र, नाशिकच्या दोन्ही पथकांकडे मनुष्यबळाचा तुटवडा निर्माण झाला आहे. अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समिती नाशिक एकच्या दक्षता पथकात पूर्णवेळ पोलिस उपधीक्षक आहे, तर दोन कंत्राटी पोलिस निरीक्षक आहेत. पोलिस शिपाईची कमतरता आहे. नाशिक दोनच्या पथकाला पूर्णवेळ पोलिस उपअधीक्षक नसल्याने त्यांची मोठी गैरसोय होत आहे. त्यातच नवीन आकृतिबंधामुळे पोलिस निरीक्षकांचे समायोजन नाशिक एकच्या पथकात झाल्याने ती पदे रिक्त आहेत. सध्या नाशिकच्या दोन्ही दक्षता पथकात तीन पोलिस निरीक्षकांना करार पद्धतीने सेवेत दाखल करून घेतले आहे. उर्वरित रिक्तपदी पूर्णवेळ कर्मचार्‍यांची प्रतीक्षा कायम आहे. दरम्यान, नाशिकच्या दक्षता पथकासाठी आदिवासी आयुक्तालयाच्या तिसर्‍या मजल्यावर स्वतंत्र कक्ष दिला आहे. मात्र, कक्षाची जागा अपुरी असल्याने पथकातील अधिकारी-कर्मचार्‍यांची दमछाक होते. अधिकारी-कर्मचारी अलटून-पलटून कक्षात बसून कामकाज करतात. विशेष म्हणजे दोन्ही पथकांच्या संयुक्त बैठकीत बसण्यासाठी जागा उपलब्ध होत नसल्याने अधिकारी-कर्मचार्‍यांकडून नाराजी व्यक्त होत आहे.

प्रस्तावाचा निपटारा संथगतीने
अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समित्यांना साहाय्य करण्यासाठी उपविभागीय पोलिस अधिकार्‍यांच्या अधिपत्याखाली स्वतंत्र पोलिस दक्षता पथकाची निर्मिती केली आहे. दक्षता पथकातील अधिकार्‍यांनी प्रकरणांची तपासणी कशी केली पाहिजे, याचेही स्पष्ट निर्देश दिले. मात्र, वाहनांसह कार्यालयीन जागेच्या उपलब्धतेअभावी प्रकरणांच्या निपटार्‍याला ब्रेक लागला आहे.

वाहन निविदा मंजुरीच्या प्रतीक्षेत
नाशिकच्या दोन्ही दक्षता पथकांसाठी एकच वाहन दिले आहे. त्यामुळे एका पथकाला आठवड्यातून एकदाच वाहन उपलब्ध होते. सहा महिन्यांपूर्वी पथकांच्या दोन वाहनांची निविदा प्रक्रिया राबविली होती. मात्र, अद्यापही निविदेला मंजुरी मिळालेली नसल्याने तपासणीला जाताना पथकांना विलंब होत असल्याचे चित्र आहे.

हेही वाचा:

The post नाशिक : ‘दक्षता’ची सूत्रे कंत्राटींच्या हाती appeared first on पुढारी.