नाशिक : दहशतवादविरोधी शाखाही ‘त्या’ ड्रोनचा तपास करणार

ड्रोन

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
उपनगर येथील गांधीनगर परिसरातील कॉम्बॅक्ट आर्मी एव्हिएशन ट्रेनिंग स्कूलच्या (कॅट्स) प्रतिबंधित हवाई क्षेत्रात गुरुवारी (दि.25) रात्री 10 च्या सुमारास घिरट्या घालणार्‍या ड्रोनचा तपास आता शहर पोलिसांच्या अखत्यारीतील दहशतवादविरोधी शाखादेखील करणार आहेत. ड्रोनने घिरट्या घातल्याने या प्रकरणी उपनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असून, या प्रकरणाचा तपास उपनगर पोलिसही करीत आहेत.

देश-विदेशात ड्रोनद्वारे हल्ले करून जीवितहानी व वित्तहानी करण्यात आली आहे. त्यामुळे सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून शहर पोलिस आयुक्तालयाने 13 मे रोजी अधिसूचना काढून शहरातील 13 ठिकाणी नो ड्रोन फ्लाय झोन जाहीर केले आहेत. त्यात कॅट्सच्या परिसराचाही समावेश आहे. मात्र, गुरुवारी (दि.25) रात्री दहाच्या सुमारास कॅट्सच्या रडारवर हवाई क्षेत्रात ड्रोन उडत असल्याची माहिती समजली. अंदाजे 800 मीटर उंचीवर हे ड्रोन घिरट्या घालत होते. हे ड्रोन पाडण्याची तयारी सुरू असतानाच ड्रोन तेथून दिसेनासे झाले. या प्रकरणी उपनगर पोलिस ठाण्यात अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल आहे. अ‍ॅन्टिटेरिझम ब—ँचने (एटीबी) समांतर तपास सुरू केला आहे, अशी माहिती पोलिस आयुक्त जयंत नाईकनवरे यांनी सोमवारी (दि.29) दिली. दरम्यान, शहरातील वीस ड्रोनचालक व ऑपरेटरची उपनगर पोलिसांनी सोमवारी दिवसभर चौकशी केली. त्यात हवाई हद्दीत उडणारे ड्रोन कुणाचे होते, कुणी उडविले याचा तपास मात्र लागलेला नाही.

लॉन्सधारकांना नोटिसा
दोन महिन्यांपूर्वीच शहर पोलिसांकडून शहरातील लग्न समारंभासह विविध उत्सव सोहळे होणार्‍या लॉन्सधारकांना नोटिसा बजावल्या आहेत. त्यानुसार समारंभादरम्यान ड्रोनचा वापर करावयाचा असल्यास त्या संदर्भात पोलिस आयुक्तालयाकडे रीतसर परवानगी घेण्यात यावी, अशी सूचना केली आहे. विनापरवानगी ड्रोन उडविल्यास संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात येईल, असाही इशारा पोलिसांनी दिला आहे.

हेही वाचा :

The post नाशिक : दहशतवादविरोधी शाखाही ‘त्या’ ड्रोनचा तपास करणार appeared first on पुढारी.