Site icon

नाशिक : दादा भुसे यांच्या घरासमोर १६ जानेवारीला बिऱ्हाड आंदोलन

दिंडोरी; पुढारी वृत्तसेवा : पालकमंत्री दादा भुसे यांच्या घरासमोर १६ जानेवारी रोजी बिऱ्हाड आंदोलन करण्यात येणार आहे. या संदर्भात माहिती देण्यासाठी नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक शहाजी उमप यांची नाशिक जिल्हा बँक शेतकरी बचाव कृती समितीचे मार्गदर्शक व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष संदीप जगताप, सदस्य गंगाधर निखाडे, प्रशांत कड, संतोष रेहरे, बाबा कावळे, बापूसाहेब महाले यांनी भेट घेऊन आंदोलनाची दिशा स्पष्ट केली.

नाशिक जिल्हा बँकेने ६२ हजार शेतकऱ्यांच्या जमिनीची लिलाव प्रक्रिया सुरू केली आहे. मुद्दलपेक्षा अनेक पटीने व्याज लावल्यामुळे शेतकऱ्यांच्या जमिनीच्या किमतीपेक्षा कर्ज अधिक झाले आहे. त्यामुळे नाशिक जिल्ह्यातील साधारण ६५ हजार शेतकरी भूमिहीन होण्याच्या मार्गावर आहेत. नाशिक जिल्ह्यात याविरुद्ध मोठा आक्रोश आहे. सरकारने नाशिक जिल्हा बँकेला राष्ट्रीयकृत बँकेप्रमाणे ओटीएस करण्याचा आदेश द्यावा. व त्यासाठी योग्य तो हस्तक्षेप करावा. ६२ हजार शेतकऱ्यांच्या जमिनी वाचवाव्यात. या प्रमुख मागणीसाठी शेतकरी बचाव कृती समितीच्या वतीने १६ जानेवारीला पालकमंत्री दादा भुसे यांच्या मालेगाव येथील निवासस्थानासमोर आंदोलन करणार आहेत.

यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते व माजी खासदार राजू शेट्टी यांच्या प्रमुख उपस्थितीत बिऱ्हाड आंदोलन करण्यात येणार आहे. यावेळी शेतकरी संघटनेचे नेते अनिल धनवट, ललित बहाळे, सीमाताई नरोडे सहभागी होणार आहेत. या आंदोलनाची सुरवात कृती समिती, स्वाभिमानी शेतकरी संघटना, शेतकरी संघटना यांनी केली आहे. तर सर्वपक्षीय नेते, कार्यकर्ते, गावोगावी या आंदोलनाची जनजागृती करत आहेत. उत्स्फूर्तपणे आंदोलनाला प्रतिसाद मिळत आहे.

नाशिक जिल्ह्यातील ६२ हजार शेतकरी भूमिहीन होत असताना या शेतकऱ्यांना न्याय मागायचा असेल तर जिल्ह्यातील पालकत्वाची जबाबदारी ज्यांच्यावर आहे. ते पालकमंत्री दादा भुसे हेच शेतकऱ्यांना न्याय देऊ शकतात. म्हणून हे आंदोलन आम्ही त्यांच्या घरासमोर करणार आहोत. या संपूर्ण शेतकऱ्यांच्या पालकत्वाची जबाबदारी त्यांची असून ते पार पाडतील, अशी अपेक्षा आहे. अन्यथा, हे आंदोलन तीव्र करण्यात येईल.

 – संदीप जगताप, प्रदेशाध्यक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना

 

The post नाशिक : दादा भुसे यांच्या घरासमोर १६ जानेवारीला बिऱ्हाड आंदोलन appeared first on पुढारी.

Exit mobile version