नाशिक : दारू पिऊन आल्यास पाच हजारांचा दंड

नाशिक (सप्तशृंगगड) : पुढारी वृत्तसेवा
कळवण तालुक्यातील सप्तशृंगगडाच्या पायथ्याशी असलेल्या दरेगाव (वणी) येथील गावात महिलांनी दारूबंदीचा निर्णय घेतला असून गावात दारू पिऊन आल्यास पाच हजार रुपयांचा दंड ठोठावण्याचा ठराव सर्वसंमतीने करण्यात आला. बायको-मुलांना मारझोड केल्यास 10 हजार रुपयांचा दंड करण्याचाही निर्णय यावेळी घेण्यात आला.

गावात दारूने अनेक कुटुंब उद्ध्वस्त झाले असून अनेक विवाहिता विधवा झाल्याचे महिलांनी सांगितले. तरुण मुले व्यसनाच्या आहारी गेले आहेत. गावात वादविवाद होत असताना गावातील सर्व महिलांनी एकत्र येत संसार वाचविण्यासाठी या रणरागिणींनी दुर्गावतार धारण करून गावात दारूबंदीचा निर्णय घेतला. सुमारे 250 महिलांनी एकत्र येऊन हा निर्णय घेतला. दारू पिऊन येणार्‍यास गावातच चोप देण्याचाही निर्णयही घेण्यात आला. गावातील मंदिरात 200/250 महिला व तेवढेच पुरुषही जमा झाल्यानंतर दारूबंदीचा निर्णय तंटामुक्त समितीचे अध्यक्ष धनराज राऊत यांना महिलांनी सांगितला असून, सकाळी राऊत व गाव पंचांनी गावात दवंडी देत त्याची माहिती दिली. यात गावात दारू पिऊन आलेला कोणी गावातील व्यक्ती आढळल्यास त्याला पाच हजार रुपये दंड व घरात बायकोला किंवा मुलांना मारझोड केल्यास त्याला 10 हजार रुपये दंड घेतला जाईल, असे महिलांकडून सांगण्यात आले. गावात यापुढे विकणार नाही किंवा पिऊन येणार नाही असा ठराव करण्यात आला. यासाठी तंटामुक्ती कमिटीचा ठराव करत उपस्थितांच्या सह्या घेण्यात आला. यावेळी कलावती गायकवाड, विमल राऊत, कलीबाई गायकवाड, सुमन ठाकरे, संगीता बहिरम, लक्ष्मी बहिरम, सावित्री कुवर, रेखा गवळी, सोनी चव्हाण, कलावती जाधव, शोभा गवळी, सिंधुबाई गवळी, राधाबाई बहिरम, लक्ष्मीबाई दळवी, गंगूबाई महाले, प्रभावती भोये, फुलाबाई भोये, अनिता गांगुर्डे, मोहना बहिरम, काळीबाई जोपळे, वंदना बहिरम, पुंडलीक गवळी, नामदेव बाहिरम, रामदास चव्हाण, मन्साराम गवळी, मोहन ठाकरे, हिरामण ठाकरे, दशरथ बाहिरम, यशवंत बहिरम, सुदाम चव्हाण, सुरेश गायकवाड, संजय गायकवाड, सोमनाथ गवळी आदी उपस्थित होते.

गावात दारूबंदी करण्याचा निर्णय होऊन तटामुक्त समिती, सरपंच व पंच कमिटी यांना याबाबत सूचना देण्यात आल्या. त्याची दवंडी देण्यात आली असून दारू पिऊन गावात आले, तर पाच हजार रुपयांचा दंड ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. – धनराज राऊत, अध्यक्ष, तंटामुक्त समिती दरेगाव.

हेही वाचा:

The post नाशिक : दारू पिऊन आल्यास पाच हजारांचा दंड appeared first on पुढारी.