
नाशिक (पंचवटी) : पुढारी वृत्तसेवा
दिंडोरी नाक्याजवळील अभिषेक स्वीट्ससमोर सायंकाळी भर रस्त्यात धारदार शस्त्राने वार करून हत्या करण्यात आली होती. या खुनातील तीन संशयितांना अवघ्या दोन तासात पकडण्यात पोलिसांना यश आले असून पंचवटी ठाणेचे गुन्हे शोध पथकाने मानवी कौशल्याचा वापर करून तसेच तांत्रीक विश्लेषन शाखा याची वेळोवेळी मदत घेवुन खुनाच्या क्लिष्ट गुन्हयाची उकल केली असून संशयितांना अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले असल्याची माहिती पोलीस उपायुक्त डॉ किरणकुमार चव्हाण यांनी आयोजित पत्रकार परिषदे दरम्यान दिली. दरम्यान संशयितांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
किरण सुकलाल गुंजाळ (२७, रा. नवनाथ नगर, पेठ रोड) याची दिंडोरी नाक्याजवळील अभिषेक स्वीट्ससमोर रस्त्यात धारदार शस्त्राने वार करून हत्या करण्यात आल्याची घटना (दि. ६) रोजी घडली होती. तर मयत हा रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असल्याचे मागील पोलीस रेकॉर्ड वरून समजले होते. तसेच सन २०१८ साली किरण गुंजाळ याच्या मोठ्या भावाचा देखील खून करून हत्या करण्यात आली होती.
याप्रकरणी पंचवटी पोलिसांनी नितीन पांडुरंग साबळे, (२१, रा. शनिमंदीर मागे, पेठरोड) देवा उत्तम पाटील, (२२, रा. राजवाडा, निमाणी समोर) व दिपक रामान्ना वर्धे, (२३, रा. गजानन चौक, कोमटी गल्ली) या संशयितांना अटक केली आहे. मयत व आरोपी यांच्यामध्ये ( दि.६) रोजी सायंकाळी भाजी मार्केटमध्ये एकत्र काम करीत असतांना किरकोळ वाद झाला होता. सदर वादातून आरोपी यांनी त्यांच्याकडे असलेल्या चाकुने मयताचे गळयावर व पोटात वार करून जिवे ठार मारुन पळुन गेले होते. पत्रकार परिषदेला पोलीस उपायुक्त डॉ किरणकुमार चव्हाण, पोलीस उपायुक्त प्रशांत बच्छाव, सहाय्यक आयुक्त गंगाधर सोनवणे, पंचवटी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सिताराम कोल्हे, गुन्हे शाखेचे विजय ढमाळ हे उपस्थित होते. तर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक (गुन्हे) रणजीत नलावडे करीत आहे.
गुन्हातील रीक्षा सापडेना
मयत किरण गुंजाळ यांचा खून केल्यानंतर ज्या रिक्षातून संशयित पळून गेले होते व त्याच रिक्षाचा खुप अंतरापर्यंत पाठलाग करून तसेच मानवी कौशल्याचा व तांत्रीक विश्लेषनाचा वापर करून तिघा संशयितांना अवघ्या दोन तासात पकडले होते. त्या रिक्षाचा शोध मात्र अजून पर्यंत पोलिसांना लागलेला नाही.
हेही वाचा:
- पिंपळनेर : पालकमंत्र्यांसह खासदार, आमदार शेतक-यांच्या बांधावर; लवकरच मदत मिळेल : गिरीश महाजन
- WhatsApp Features: व्हॉट्सअॅपचे नवे फिचर लाँच; अनोळखी नंबर करता येणार म्यूट
- धुळवड निफाडची : मॉडर्न झाली डसनडुकरी
The post नाशिक : दिंडोरी नाका खून प्रकरणातील संशयितांना दोन तासात अटक appeared first on पुढारी.