नाशिक : दिंडोरी बाजार समिती; सभापतीपदी प्रशांत कड तर उपसभापती पदी कैलास मवाळ बिनविरोध

दिंडोरी www.pudhari.news

नाशिक (दिंडोरी) : पुढारी वृत्तसेवा

दिंडोरी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी प्रशांत कड तर उपसभापतीपदी कैलास मवाळ यांची बिनविरोध निवड झाली आहे. दिंडोरी कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक नुकतीच होत सर्वपक्षीय परिवर्तन पॅनलला 11 जागा मिळत बहुमत मिळाले. तर दत्तात्रेय पाटील प्रवीण जाधव यांचे शेतकरी उत्कर्ष पॅनलला पाच तर व्यापारी गटातून दोन जण निवडून आले. बुधवार (दि.24) बाजार समिती सभागृहात निवडणूक निर्णय अधिकारी चंद्रकांत विघ्ने यांच्या उपस्थितीत सभापती उपसभापती निवडणूक झाली.

सर्व संचालकांना सोबत घेत बाजार समितीत शेतकऱ्यांना विविध पायाभूत सुविधा उपलब्ध करून देत शेतकरी हिताला प्राधान्य देवून बाजार समितीचे विकासासाठी कटिबद्ध राहून बाजार समितीचा नाव लौकिक वाढवण्यासाठी प्रयत्नशील राहू. – प्रशांत कड, नवनिर्वाचित सभापती.

यावेळी सभापती पदासाठी प्रशांत कड व उपसभापती पदासाठी कैलास मवाळ यांचे एकमेव अर्ज दाखल झाल्याने निवडणूक निर्णय अधिकारी यांनी त्यांची बिनविरोध निवड जाहीर केली. परिवर्तन पॅनलचे अकरा तर व्यापारी गटातील दोन संचालक असे तेरा संचालक यावेळी उपस्थित होते. तर दत्तात्रेय पाटील यांचे शेतकरी उत्कर्ष पॅनलचे पाच संचालक यावेळी अनुपस्थित होते. निवड जाहीर होताच समर्थक कार्यकर्त्यांनी फटाके फोडून गुलाल उधळत आनंदोत्सव साजरा केला. यावेळी जिल्हा बँक संचालक गणपतराव पाटील, माजी आमदार रामदास चारोस्कर, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख भाऊलाल तांबडे, सुरेश डोखळे, सुनील पाटील, प्रकाश शिंदे, अविनाश जाधव, विलास कड, सुरेश कळमकर, माधव साळुंखे, नामदेव घडवजे, विलास घडवजे, तुकाराम जोंधळे, विश्वासराव देशमुख, भाऊसाहेब बोरस्ते, नरेंद्र जाधव, गंगाधर निखाडे, योगेश बर्डे, दत्तू भेरे, पांडुरंग गडकरी, दत्तू राऊत, काका चौधरी, बंडू भेरे, गोपीनाथ गांगुर्डे, महेंद्र बोरा, विक्रम मवाळ, माणिक उफाडे, दशरथ उफाडे, रतन बस्ते, अरुण अपसुंदे, जमीर शेख आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बाजार समिती आवारात शेतकऱ्यांना विविध पायाभूत सुविधा उपलब्ध करून देत शेतकरी व व्यापारी यांच्यामध्ये समन्वय ठेवून शेतकरी हिताला प्राधान्य दिले जाईल. विविध उपबाजार यांचा विस्तार करत नवीन बाजारपेठ उपलब्ध करून दिली जाईल. – कैलास मवाळ नवनिर्वाचित उपसभापती बाजार समिती, दिंडोरी.

हेही वाचा:

The post नाशिक : दिंडोरी बाजार समिती; सभापतीपदी प्रशांत कड तर उपसभापती पदी कैलास मवाळ बिनविरोध appeared first on पुढारी.