Site icon

नाशिक : दिंडोरी येथे विद्युत शॉक देऊन मारण्याचा प्रयत्न

दिंडोरी; पुढारी वृत्तसेवा : तालुक्यातील उमराळे खुर्द येथील सरपंच व सदस्यांना त्रास व्हावा या उद्देशाने सार्वजनिक विहिरीच्या कंपाऊंड मध्ये विजेचा प्रवाह सोडल्याची घटना उघडकीस आली. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवीतहानी झालेली नाही. दिंडोरी पोलिसांनी या घटनेचा तपास करत संशयित आरोपीवर मनुष्य वधाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. फकीरा चारोस्कर ग्रामपंचायत पाणीपुरवठा कर्मचारी यांनी दिंडोरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

ग्रामपंचायत उमराळे खुर्द येथील पाणीपुरवठा कर्मचारी चारोस्कर हे दि. १४ फेब्रुवारी रोजी सकाळी १०.२५ वाजण्याच्या सुमारास नेहमी प्रमाणे गावातील पाण्याची मोटर चालु करण्यासाठी विहीरीजवळ गेले होते. विहीरीच्या आजुबाजुस तारेचे कुंपण केलेले होते व त्याला एक लोखंडी गेट बसवलेला आहे. चारोस्कर यांना लोखंडी गेट उघडत असताना विजेचा जोरदार झटका बसला. त्यामुळे ते भोवळ आल्याने खाली पडले. शेजारी शेतात काम करण्याऱ्या शेतकऱ्यांनी ही घटना पाहिली असता त्यांनी त्वरित विजपुरवठा बंद केला. त्यानंतर त्यांच्या भावाने त्यांना पुढील उपचारसाठी दिंडोरी येथे खाजगी रुग्णालयात दाखल केले. त्यांच्यावर वेळीच उपचार झाल्याने ते बचावले. दरम्यान मोटारच्या वायरमधील एक वायर ही विहीरीच्या लोखंडी तारा असलेल्या कुंपणाला लावलेली असल्याचे निदर्शनास आले.

विशेष म्हणजे सरपंच रिंकू चारोस्कर हे स्वतःही संबंधित पाण्याची मोटर चालू करतात. त्यामुळे त्यांच्या जीविताला धोका आणण्यासाठी कुणीतरी हा प्रकार केल्याचा ग्रामस्थांना संशय आला यानंतर दिंडोरी पोलीस ठाण्यात फिर्याद देण्यात आली. दिंडोरी पोलिसांनी अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करत कारवाई केली.

पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक मोनिका जेजोट यांनी तपास सुरू केला. तपासात संतोष निंबा गांगोडे रा. उमराळे खुर्द यांनी जाणीवपूर्वक वीज प्रवाह सोडण्याचा प्रकार उघडकीस आला व संशयितास अटक केली.पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ,पोलीस उपनिरीक्षक मोनिका जेजोट यांनी सदर गुन्ह्याचा तपास लावयाबद्दल उमराळे खुर्द येथील ग्रामस्थांनी त्यांचे आभार मानत त्यांचे अभिनंदन केले.

The post नाशिक : दिंडोरी येथे विद्युत शॉक देऊन मारण्याचा प्रयत्न appeared first on पुढारी.

Exit mobile version