नाशिक : दिवाळी खरेदीचा ‘सुपर सन्डे’

दिवाळी खरेदी नाशिक

नाशिक : पुढारी वृत्तसेवा ; आठवडाभरावर दिवाळी आल्याने नाशिककरांनी खरेदीसाठी बाजारपेठांमध्ये रविवारी (दि. ५) दिवसभर तुफान गर्दी केली होती. त्यामुळे बाजारपेठा गर्दीने फुलल्या होत्या. शहर पोलिसांनीही खबरदारी म्हणून पोलिस बंदोबस्ताचे तसेच वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी नियोजन केले होते.

शुक्रवारी (दि. १०) धनत्रयोदशीपासून दिवाळीला सुरुवात होणार आहे. रविवारी (दि. १२) लक्ष्मीपूजन असल्याने दिवाळीनिमित्त खरेदीची लगबग सुरू झाली आहे. अनेकांचे वेतन जमा झाल्याने आणि रविवारची सुटी असल्याने नागरिकांनी सहकुटुंब खरेदीसाठी शहरातील विविध बाजारपेठांमध्ये तसेच मॉलमध्ये गर्दी केली होती. शहरातील मेनरोड येथील बाजारपेठ सकाळपासूनच नागरिकांच्या गर्दीने फुलली होती. दुकानदारांसह छोट्या विक्रेत्यांकडे खरेदीदारांची गर्दी पाहावयास मिळाली. यात कपडे, आकाशकंदील, फटाके, भेटवस्तू, चपलांसह महिला वर्गाकडून फराळाचे साहित्य, खाद्यपदार्थ खरेदी करण्यासाठी गर्दी पाहावयास मिळाली. नागरिकांना आकर्षित करण्यासाठी व्यावसायिकांनीही खरेदीवर सूट दिल्याचे दिसून आले. रविवार असल्याने नागरिकांनी बाजारपेठांमध्ये गर्दी केल्याचे पाहावयास मिळाले.

गर्दीमुळे वाहतुकीचे नियोजन करण्यात आले असून, बाजारपेठांमध्ये वाहनांना प्रवेश बंद होता, तर वाहतुकीसाठी पर्यायी मार्ग देण्यात आले आहेत. मात्र काही ठिकाणी रस्त्याच्या दुतर्फा वाहने उभी केल्यामुळे तसेच गर्दी झाल्याने वाहतूक कोंडी झाली होती.

हेही वाचा :

The post नाशिक : दिवाळी खरेदीचा 'सुपर सन्डे' appeared first on पुढारी.