नाशिक : दीड लाखांची लाच घेणारा चालक कारागृहात

कारागृह,www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

दीड लाख रुपयांची लाच घेणाऱ्या शासकीय वाहनचालक अनिल बाबूराव आगिवले (४४) यास सोमवारी (दि.६) नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात रवाना करण्यात आले. त्यास सोमवारी नाशिक न्यायालयात हजर केले असता त्यास न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. दरम्यान, तक्रारदाराने दिलेल्या फिर्यादीनुसार, तत्कालीन प्रांताधिकाऱ्याच्या मागणीनुसार चालकाने लाच घेतल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यानुसार लाचलुचपत प्रतिबंध विभाग पुरावे गोळा करून तक्रारीची शहानिशा करीत आहेत.

शेतजमिनीच्या वादासंदर्भातील निकाल तक्रारदाराच्या बाजूने लावण्यासाठी दोन लाख रुपयांची लाच तक्रारदाराकडे मागण्यात आली. संशयित आगिवले याने गडकरी चौकातील शासकीय विश्रामगृहाच्या मागील रस्त्यावर तक्रारदाराकडून दीड लाख रुपयांची लाच स्वीकारली. त्यावेळी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने त्यास रंगेहाथ पकडले. या प्रकरणी मुंबई नाका पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल आहे. तत्कालीन प्रांताधिकारी तेजस चव्हाण यांच्या वाहनावर संशयित हा चालक होता. चव्हाण यांनी दिलेल्या निकालासाठी त्याने प्रांताधिकाऱ्यांसाठी दोन लाखांची मागणी करून यापूर्वी पन्नास हजार घेतल्याचे तक्रारदाराने फिर्यादीत म्हटले आहे. त्यादृष्टीने आगिवले यांच्याशी संपर्कात असणाऱ्यांचा तपास केला जात आहे. तत्कालीन प्रांताधिकाऱ्यांचा लाचेत सहभाग असल्याचे सबळ पुरावे मिळाले नसल्याचे सूत्रांनी सांगितले. या प्रकरणातील सर्व दस्तऐवजांचा सखोल तपास सुरू आहे.

हेही वाचा :

The post नाशिक : दीड लाखांची लाच घेणारा चालक कारागृहात appeared first on पुढारी.