नाशिक : देवदर्शन अन् स्नानासाठी गोदापात्रात तुडुंब गर्दी

नाशिक गोदापात्र,www.pudhari.news

नाशिक, पंचवटी : पुढारी वृत्तसेवा

मकरसंक्रांतीचे पौराणिक आणि धार्मिक महत्त्व, त्यात रविवारची सुट्टी आणि त्र्यंबकेश्वरला निवृत्तिनाथ महाराज यात्रेसाठी ठिकठिकाणांहून दाखल झालेल्या दिंड्यांमुळे यंदा मकरसंक्रांतीला रामकुंडावरील गर्दीत प्रचंड भर पडून स्नानासाठी गोदेचे पात्र अक्षरश: तुडुंब भरले होते. पहाटेपासून झालेली ही गर्दी सायंकाळपर्यंत कायम होती. परिसरातील मंदिरात दर्शन आणि पूजेसाठी महिला भाविकांच्या रांगा लागल्याने अक्षरश: कुंभमेळ्यासारखे वातावरण पाहायला मि‌ळाले.

ज्योतिषशास्त्रानुसार मकरसंक्रांतीच्या दिवशी सूर्य आणि शनी ३० वर्षांनंतर मकर राशीत भेटतात. त्यामुळे या दिवसाला विशेष महत्त्व आहे. या दिवशी तीर्थक्षेत्रे आणि पवित्र नद्यांमध्ये स्नान व दान केल्यास राशीनुसार पुण्य प्राप्त होते. या दिवशी केलेल्या दानामुळे सूर्यदेव प्रसन्न होतात व दान शतपटीने वाढते आणि त्याचे फळ मिळते, अशी श्रद्धा आहे. नदीत स्नान केल्याने मनुष्य पापातून मुक्त होतो. त्यामुळे आज गोदा परिसर हजारो भाविकांनी फुलून गेला होता.

रामकुंडात स्नान करून महिलांची परिसरातील बाणेश्वर, कर्पुरेश्वर, त्यागेश्वर, सिद्धेश्वर महादेव मंदिरांत पूजेसाठी गर्दी उसळली होती. त्यानंतर कपालेश्वर महादेव मंदिर, काळाराम मंदिर, सीतागुंफा येथे दर्शन व पूजा करण्यासाठी जात होत्या. संक्रांतीला वाण देण्याची परंपरा असल्याने असे वाण घेणारे रामकुंडाच्या पूर्वेला, रामकुंडाच्या पुलावर, गांधी तलाव परिसर येथे बसलेले होते. तांदूळ, डाळी, तीळ आदींचे वाण देण्यात येत होते.

त्र्यंबकेश्वरला निवृत्तिनाथ महाराज यात्रोत्सवासाठी जाणाऱ्या दिंड्या शहर परिसरातून जाताना रामकुंडावर येतात. या दिंड्या रविवारी मोठ्या संख्येने आल्या असल्याने रामकुंडावरील गर्दीत आणखी भर पडली. दिंड्या जुना भाजीबाजार पटांगण, यशवंतराव महाराज पटांगण येथे थांबविण्यात येत होत्या. सुट्टी आणि सण एकाच दिवशी आल्याने वाढलेल्या भाविक व पर्यटकांची संख्या वाढली होती. त्यामुळे गोदाघाटाच्या रस्त्यावर वाहनांची दिवसभर कोंडी होत असल्याचे दिसत होते. वाहनांची गर्दी होत असताना त्यांच्यावर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न पोलिसांकडून होत नसल्याने ही कोंडी वाढत होती. कपुरथळा, रोकडोबा, म्हसोबा पटांगण व गौरीपटांगण येथे वाहनतळ वाहनांनी फुल्ल झालेली होती.

वस्त्रांतरगृह उभारण्याची मागणी

स्नान केल्यानंतर कपडे बदलण्यासाठी व्यवस्था नसल्याने महिलांना उघड्यावर कपडे बदलण्याची वेळ येत होती. सण-उत्सवाच्या काळात महिलांच्या वस्त्रांतराचा प्रश्न निर्माण होतो. तात्पुरत्या स्वरूपात वस्त्रांतर कक्ष उभारण्याची मागणी केली जाते. मात्र, अजूनही अशी व्यवस्था करण्यात येत नसल्याने महिलांची कुचंबना होते.

पूजेसाठी लागणारे साहित्य, हरभऱ्याचे घाटे, ऊस, गव्हाची ओंबी, गाजर, बोळके, पणत्या, फुले आदींची विक्री करणाऱ्यांनी दुकाने मांडली होती. तसेच महिलांची गर्दी होत असल्याने सौंदर्यप्रसाधनाच्या साहित्यांची विक्री करणाऱ्यांनीही संधी सोडली नाही. जागा मिळेल तेथे त्यांनी विक्रीचे साहित्य मांडले. 

हेही वाचा : 

The post नाशिक : देवदर्शन अन् स्नानासाठी गोदापात्रात तुडुंब गर्दी appeared first on पुढारी.