नाशिक: देवळाच्या नगराध्यक्ष पदासाठी भाग्यश्री पवार यांचा एकमेव अर्ज दाखल

Bhagyashree Pawar

देवळा; पुढारी वृत्तसेवा : देवळा नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष पदासाठी आज (दि. ३०) उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अंतिम दिवशी नगरसेविका भाग्यश्री अतुल पवार यांनी आपला एकमेव उमेदवारी अर्ज मुख्याधिकारी श्यामकांत जाधव यांच्याकडे दाखल केला. त्यामुळे त्यांची नगराध्यक्षपदी बिनविरोध निवड घोषित होण्याची फक्त औपचारिकता बाकी आहे.

नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार भाग्यश्री पवार यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आमदार डॉ. राहुल आहेर, भाजपचे जिल्हा नेते केदा नाना आहेर, गटनेते संभाजी आहेर, नगरसेवक जितेंद्र आहेर, अशोक आहेर, मनोज आहेर, कैलास पवार, बाजार समितीचे संचालक भाऊसाहेब पगार आदी उपस्थित होते. देवळा नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष पदाच्या रिक्त जागांसाठी जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी निवडणूक घेणे कामी अधिसूचना नुकतीच जाहीर केली आहे.

देवळा नगरपंचायतीच्या मावळत्या नगराध्यक्षा सुलभा जितेंद्र आहेर यांनी आवर्तन पद्धतीनुसार २० ऑक्टोबररोजी आपल्या अध्यक्ष पदाचा राजीनामा जिल्हाधिकारी जलज शर्मा यांच्याकडे दिला आहे. तर उपनगराध्यक्ष अशोक आहेर यांनीही १८ ऑक्टोबररोजी राजीनामा दिला आहे. या दोन्ही रिक्त पदांसाठी जिल्हाधिकाऱ्यांनी निवडणूक कार्यक्रम घोषित केला आहे. नगराध्यक्ष पदासाठी ३० ऑक्टोबररोजी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा अंतिम दिवस होता. बुधवारी (दि. १) छाननी व वैध उमेदवारी यादी प्रसिद्ध करणे, २ नोव्हेंबररोजी माघार आणि ६ नोव्हेंबररोजी सकाळी ११ वाजता निवडणूक घेण्यात येणार आहे.

नगराध्यक्ष पदासाठी भाजपचे तालुका अध्यक्ष व माजी उपनगराध्यक्ष अतुल पवार यांच्या सुविद्य पत्नी भाग्यश्री पवार यांचा एकमेव उमेदवारी अर्ज दाखल झाला आहे. त्यामुळे त्यांच्या बिनविरोध निवडीची फक्त औपचारिकता बाकी आहे.

हेही वाचा 

The post नाशिक: देवळाच्या नगराध्यक्ष पदासाठी भाग्यश्री पवार यांचा एकमेव अर्ज दाखल appeared first on पुढारी.