नाशिक : देवळा नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष पदाची ६ नोव्हेंबरला निवडणूक

निवडणूक

देवळा(जि. नाशिक) ;  देवळा नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष पदाची निवडणूक ६ नोव्हेंबर रोजी होणार आहे. देवळा नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष पदाच्या रिक्त जागांसाठी जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी निवडणूक घेण्यासाठी अधिसूचना नुकतीच जाहीर केली आहे.

देवळा नगरपंचायतीच्या मावळत्या नगराध्यक्षा सुलभा जितेंद्र आहेर यांनी आवर्तन पद्धतीनुसार दिनांक २० ऑक्टोबर रोजी आपल्या अध्यक्ष पदाचा राजीनामा जिल्हाधिकारी जलज शर्मा यांच्याकडे दिला आहे. तर उपनगराध्यक्ष अशोक आहेर यांनीही दि. १८ ऑक्टोबर रोजी राजीनामा दिला आहे. या दोन्ही रिक्त पदांसाठी जिल्हाधिकाऱ्यांनी निवडणूक कार्यक्रम घोषित केला असून, नगराध्यक्ष पदासाठी येत्या ३० ऑक्टोबर रोजी उमेदवारी अर्ज दाखल करणे व छानणी दि. १ नोव्हेंबर रोजी वैध उमेदवारी यादी प्रसिद्ध करणे, दि .२ नोव्हेंबर रोजी माघार व दि. ६ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता निवडणूक घेण्यात येणार आहे. त्यानंतर लागलीच नूतन नगराध्यक्षांच्या अध्यक्षतेखाली उपनगराध्यक्ष पदाची निवडणूक घेण्यात येणार आहे. अशी माहिती तहसीलदार तथा पीठासीन अधिकारी विजय सूर्यवंशी यांनी दिली.

नगराध्यक्ष पदासाठी भाजपचे तालुका अध्यक्ष व माजी उपनगराध्यक्ष अतुल पवार यांच्या सुविद्य पत्नी भाग्यश्री पवार यांच्या नावाची चर्चा असून, नूतन नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष पदाची माळ कोण्याच्या गळ्यात पडते हे पाहणे औत्सुक्याचे ठरले आहे.

हेही वाचा :

The post नाशिक : देवळा नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष पदाची ६ नोव्हेंबरला निवडणूक appeared first on पुढारी.