नाशिक : देवळा येथे एकाच रात्रीत चार ठिकाणी घरफोड्या; ५० हजारांची रोकड लंपास

देवळा; पुढारी वृत्तसेवा : देवळा शहर व गुंजाळनगर येथे दुकान व बंद घरांचे कुलुपे तोडत अज्ञात चोरट्यांनी पन्नास हजार रुपयांची रोकड लंपास केली. एकाच रात्री चार ठिकाणी घरफोड्या झाल्याने शहर परिसरातील नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे. याबाबत देवळा पोलिसांत अज्ञात चोरट्यांविरुद्ध घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सध्या लग्नसराई जोरात असल्याने घरे बंद असण्याचे प्रमाण वाढले आहे. याचाच फायदा चोरट्यांनी उठवत घरे फोडण्याचे सत्र अवलंबिले आहे. देवळा कळवण रोडवरील की व्हिजन ऍग्रो प्रोड्युसर कंपनीच्या शेतीविषयक औषधे व खते विक्री करणाऱ्या दुकानाचे मागील पत्रे उचकवत आत प्रवेश करून चोरट्यांनी गल्ल्यातील पंचवीस हजार रुपयांची रोकड लंपास केली. सीसीटीव्ही फुटेज मध्ये त्यांच्या हालचाली दिसत आहेत. याशिवाय शहरानजीकच्या गुंजाळनगर येथील प्राथमिक शिक्षक मनेश गवळी यांच्या बंद घराचे कुलूप तोडत घरातील पंचवीस हजार रुपयांचा रोख ऐवज चोरून नेला. याशिवाय प्रकाश सावंत यांच्या घरातील भाडेकरू शरद मेधने आणि आर.डी. पाटील यांचीही घरे फोडण्यात आली आहेत. एकाच रात्रीत एवढया घरफोड्या झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवावी, अशी मागणी शहर व उपनगरातील रहिवाशांनी केली आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक समीर बारवकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार चंद्रकांत निकम, शेख शरीफ आदी करीत आहेत.

The post नाशिक : देवळा येथे एकाच रात्रीत चार ठिकाणी घरफोड्या; ५० हजारांची रोकड लंपास appeared first on पुढारी.