नाशिक : दै.’पुढारी’तर्फे आयोजित सरपंच सन्मान सोहळा उत्साहात

सरपंच सन्मान सोहळा,www.pudhari,news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

राज्य आणि देशपातळीवरील राजकारणाचे प्राथमिक शिक्षण हे ग्रामपातळीपासूनच मिळते. ग्रामपंचायतीचा सरपंच हा मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीपर्यंत पोहोचण्याच्या मार्गातील यशाची पहिली पायरी आहे. माजी मुख्यमंत्री स्व. विलासराव देशमुख हे त्याचे मूर्तिमंत उदाहरण होय, असे नमूद करत गटतट बाजूला सारून सर्वसमावेशक ग्रामविकासाची जबाबदारी सरपंच, उपसरपंचांनी पार पाडावी. यासाठी दैनिक ‘पुढारी’ने जिल्ह्यातील कार्यतत्पर सरपंच व उपसरपंचांना दिलेली पुरस्काररूपी कौतुकाची थाप ग्रामविकासासाठी प्रेरणादायी ठरेल, असा विश्वास राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षणमंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केला.

हॉटेल एसएसके सॉलिटेअर येथे दैनिक ‘पुढारी’च्या वतीने आयोजित ‘सरपंच सन्मान सोहळ्या’प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. राज्यभर विकासकामांचा आदर्श उभा करणाऱ्या कर्तव्यतत्पर, निवडक सरपंच, उपसरपंचांचा या सोहळ्यात स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र देऊन भुजबळ यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी भुजबळ पुढे म्हणाले की, शासनाच्या विविध योजनांची पुरेपूर अंमलबजावणी ग्रामपातळीवर झाल्यास खऱ्या अर्थाने जनतेपर्यंत विकास पोहोचू शकेल. यासाठी ग्रामपंचायतीतील सरपंच, उपसरपंचांसह सर्व सदस्यांनी गटतट, मनभेद विसरून एकत्र यायला हवे. दैनिक ‘पुढारी’ने पुरस्काराच्या रूपाने दिलेली कौतुकाची थाप यासाठी प्रेरणादायी ठरेल, असे भुजबळ म्हणाले. मी मुंबईचा दोनदा ‘सरपंच’ झालो, नगरसेवक हेच त्या-त्या भागातील पंच होते. त्या नगरसेवकांमधून मी महापौरपदी निवडून आलो. सरपंचपदापासून राजकीय कारकीर्द सुरू करणारे स्व. विलासराव देशमुख हे दोन वेळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. त्यामुळेच येथे उपस्थित सरपंच, उपसरपंचांपैकी भविष्यात कोणी आमदार, मंत्री आणि मुख्यमंत्री होऊ शकेल, अशा शुभेच्छाही त्यांनी दिल्या.

ग्रामविकासाला बळकटी येण्याकरिता सरपंच, उपसरपंचांना प्रोत्साहन मिळावे यासाठीच दै. पुढारीने सरपंच सन्मान सोहळ्यासारखा उपक्रम आयोजित केल्याचे दैनिक पुढारीचे सरव्यवस्थापक दिलीप उरकुडे यांनी सांगितले. निवासी संपादक प्रताप जाधव यांनी प्रास्ताविकात दै. पुढारीची दमदार वाटचाल विशद करताना ग्रामविकास असामान्य योगदान देणाऱ्या लोकप्रतिनिधींचा हा प्रातिनिधिक कौतुक सोहळा असल्याचे नमूद केले. नाशिक ब्यूरो मॅनेजर राजेश पाटील यांनी आभार मानले. जाहिरात व्यवस्थापक बाळासाहेब वाजे व सहकाऱ्यांनी कार्यक्रमाच्या नियोजनासाठी परिश्रम घेतले.

वर्तमानपत्रांचा ‘पुढारी’!

ना. भुजबळ यांनी आपल्या अभ्यासपूर्ण भाषणात दै. पुढारीची वैभवशाली वाटचाल मांडताना दैनिक पुढारी हा वर्तमानपत्रांतील ‘पुढारी’ असल्याचा गौरवोल्लेख केला. महात्मा गांधी यांचा सहवास लाभलेल्या आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या चळवळीत योगदान दिलेल्या पद्मश्री ग. गो. जाधव यांनी १९३७ मध्ये हे वृत्तपत्र सुरू केले. देशाच्या स्वातंत्र्यलढ्यापासून ते गोवामुक्ती संग्राम, संयुक्त महाराष्ट्र चळवळीत दैनिक ‘पुढारी’ची भूमिका मार्गदर्शक राहिली. अजूनही बेळगाव, कारवारचा लढा सुरूच आहे. जगातील सर्वांत दीर्घकाळ चालणारी ही चळवळ आता नेटाने पुढे न्यावी लागेल असे ते म्हणाले.

खेड्यांची छोटी शहरं व्हावीत!

महात्मा गांधी यांनी ‘खेड्यांकडे चला’ असे आवाहन केले होते. याचा अर्थ विकास ग्रामपातळीपर्यंत पोहोचवा, असा होता. मात्र, आपण ‘शहराकडे चला’ असा उलटा अर्थ घेतला. आजच्या काळात विकास झाला पण शहरं प्रदूषित बनली. आता मोकळी हवा, शुद्ध पाण्यासाठी गावाला जा, हवा बदलून या, असा डॉक्टरांचा सल्ला घेण्याची वेळ आपल्यावर आली आहे. गावात चांगले रस्ते, पाण्याची व्यवस्था, गटारी, पथदीपांची सुविधा उपलब्ध करून देऊन खेड्यांचा कायापालट छोट्या शहरांमध्ये करण्याची गरज आहे. असे भुजबळ म्हणाले.

यांचा झाला सन्मान…

रफिक पठाण (सरपंच, बोलठाण, ता. नांदगाव), विलास कड (उपसरपंच, कसबे वणी, ता. दिंडोरी), बाळासाहेब लांबे (उपसरपंच, गोवर्धन, नाशिक), राजश्री पवार (उपसरपंच, खडकतळे, ता. देवळा), गणेश गोडे (सरपंच, घोटी बु. ता. इगतपुरी), गोरख जाधव (सरपंच, शिंदेगाव, नाशिक), ज्ञानेश्वर ढोली (सरपंच, डुबेरे, ता. सिन्नर), अश्विनी पवार (सरपंच, बोराळे, ता. नांदगाव), दिनकर बागूल (सरपंच, अहिवंतवाडी, ता. दिंडोरी), दुर्गा गुंजाळ (सरपंच, रायपूर, ता. चांदवड), नामदेव शिंदे (सरपंच, ठाणगाव, ता. सिन्नर), नंदाबाई कुवर (सरपंच, चंडिकापूर, ता. दिंडोरी), राजेंद्र पवार (सरपंच, नागापूर, ता. नांदगाव), विजय काटे (सरपंच, वावी, ता. सिन्नर), प्रिया गायधनी (सरपंच, पळसे, नाशिक), वैभव पवार (सरपंच, खामखेडा, ता. देवळा), शोभा बर्के (सरपंच, नांदूरशिंगोटे, ता. सिन्नर), शिला कोकाटे (सरपंच, खडांगळी, ता. सिन्नर), संगीता वाघ (सरपंच, जोपूळ, ता. चांदवड), संदीप शिंदे (सरपंच, पांगरी खुर्द, ता. सिन्नर), दत्तू भेरे (उपसरपंच, वनारवाडी, ता. दिंडोरी), संदीप ठुबे (उपसरपंच, मटाणे, ता. देवळा), सदानंद नवले (उपसरपंच, सारूळ, नाशिक), अर्चना निकम (सरपंच, भालूर, ता. नांदगाव), जानकाबाई चव्हाण (सरपंच, विल्होळी, नाशिक), शर्मिला गोसावी (उपसरपंच, औंदाणे, ता. बागलाण), ज्योती डंबाळे (सरपंच, चौसाळे, ता. दिंडोरी), अश्विनी खैरनार (सरपंच, अंदूरसूल, ता. येवला), प्रभाकर ठाकरे (सरपंच, नांदूरटेक, ता. चांदवड), पूनम सूर्यवंशी (सरपंच, भाक्षी, ता. बागलाण), प्रमोद निकम (सरपंच, दाभाडी, ता. मालेगाव), मनोज महात्मे (सरपंच, भाटवाडी, ता. सिन्नर), वर्षा भाबड (सरपंच, वेहेळगाव, नांदगाव), रामदास उगले (सरपंच, मुंगसरा, ता. नाशिक), शरद सोनवणे (सरपंच, गोंदेदुमाला, ता. इगतपुरी), वैशाली देवरे (सरपंच, मोरेनगर, ता. बागलाण), सोमनाथ आव्हाड (सरपंच, दापूर, ता. सिन्नर), सचिन दरेकर (सरपंच, विंचूर, ता. निफाड), सुरेश शेलार (सरपंच, येसगाव, ता. मालेगाव), जयराम गव्हाणे (उपसरपंच, कुऱ्हेगाव, ता. इगतपुरी).

The post नाशिक : दै.'पुढारी'तर्फे आयोजित सरपंच सन्मान सोहळा उत्साहात appeared first on पुढारी.