Site icon

नाशिक : दोघा बहिणींनी नोकरीसाठी 16 तरुणांना घातला गंडा, जिल्हा रुग्णालयातील प्रकार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
जिल्हा शासकीय रुग्णालयात कायमस्वरूपी नोकरी लावून देते, असे आमिष दाखवत दोघ्या सख्ख्या बहिणींनी सोळा तरुणांना गंडा घातल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. या प्रकरणी भद्रकाली पोलिस ठाण्यात संशयित दोन्ही बहिणींविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला.

अरबाज सलिम खान (24, रा. खडकाळी) या तरुणाने भद्रकाली पोलिसांकडे फसवणुकीची फिर्याद दिली आहे. अरबाजच्या फिर्यादीनुसार, संशयित फरिन जुल्फेकार शेख आणि जकीय जुल्फेकार शेख (दोन्ही रा. अजमेरी मशिदीजवळ, नाईकवाडीपुरा) यांनी फेब—ुवारी 2022 पासून गंडा घातला. दोघींनी जिल्हा रुग्णालयात कायमस्वरूपी नोकरी लावून देतो, असे सांगून अरबाजसह इतर तरुणांना आमिष दाखवले. रुग्णालयातील वरिष्ठांपर्यंत ओळख असून, काहींना रुग्णालयातही नेले. तिथे वैद्यकीय कर्मचार्‍यांच्या पोशाखात फिरून कुठे काय काम चालते, हे दाखवले. तरुणांचा विश्वास संपादन करून संशयित बहिणींनी अरबाजसह पंधरा जणांकडून सुमारे एक लाख 28 हजार रुपये घेतले होते. मात्र, कोणालाही जिल्हा रुग्णालयात नोकरी मिळाली नाही. भद्रकाली पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

वैद्यकीय पोशाखात रुग्णालयामध्ये वावर
पोलिसांच्या प्राथमिक तपासात दोघींपैकी एक खासगी कंपनीत कामास असून, दुसरी घरीच असते. दोघीही वैद्यकीय कर्मचार्‍यांच्या वेशात जिल्हा रुग्णालयात फिरायच्या. त्यामुळे या घटनेने पुन्हा एकदा जिल्हा रुग्णालयाच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

हेही वाचा :

The post नाशिक : दोघा बहिणींनी नोकरीसाठी 16 तरुणांना घातला गंडा, जिल्हा रुग्णालयातील प्रकार appeared first on पुढारी.

Exit mobile version