नाशिक : दोन कारवायांमध्ये मद्यसाठ्यासह वाळू चोरटा ताब्यात

सटाणा www.pudhari.news

नाशिक (सटाणा) : पुढारी वृत्तसेवा
सटाणा पोलिसांनी अवैध धंद्यांविरोधात मोहीम उघडली आहे. गुरुवारी (दि. 9) पहाटेच्या सुमारास ठेंगोडा येथील गणपती मंदिरामागून गिरणा नदीपात्रातून अनधिकृत वाळू वाहतूक करणार्‍या एकाला ट्रॅक्टरसह ताब्यात घेण्यात आले, तर बुधवारी (दि. 8) पश्चिम पट्ट्यातील दुर्गम भागात मोडणार्‍या मानूर येथील एकाच्या घरातून 28 हजार 755 रुपयांचा देशी-विदेशी मद्यसाठा जप्त करण्यात आला तसेच एकाला ताब्यात घेण्यात आलेे. या दोन्ही प्रकरणी गुन्ह्यांची नोंद सुरू असून पोलिसांकडून अवैध धंद्यांविरोधात सुरू असलेल्या धडक कारवाईमुळे सर्वसामान्यांमधून समाधान व्यक्त होत आहे.

बुधवारी (दि. 8) विशेष मोहीम राबवून डांगसौंदाणे दूरक्षेत्रांतर्गत येणार्‍या मानूर येथील पंढरीनाथ भालचंद्र गांगुर्डे (रा. देवळी पाडा, मानूर) याच्या राहत्या घरी छापा टाकण्यात आला. यावेळी घरात 28 हजार 755 रुपये किमतीची देशी-विदेशी दारू मिळून आली. गुरुवारी (दि. 9) पहाटेच्या सुमारास पथकाने ठेंगोडा शिवारातील वॉटर सप्लायच्या रस्त्यावर अनधिकृतरीत्या वाळू वाहतूक करणार्‍यास पकडले. या कारवाईत चेतन संजय पाटील (22, रा. गांगवण, ता. कळवण) याच्याविरोधात गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून निळ्या रंगाचा ट्रॅक्टर (एमएच 39 एबी 5958) व विनानंबरची लाल रंगाची ट्रॉली ताब्यात घेण्यात आली आहे. 5 हजार रुपये किमतीची एक ब्रास वाळू भरलेली होती. या प्रकरणी सहायक पोलिस निरीक्षक किरण पाटील यांच्या मार्गदर्शनानुसार पोलिस नाईक अजय महाजन अधिक तपास करीत आहेत.

हेही वाचा:

The post नाशिक : दोन कारवायांमध्ये मद्यसाठ्यासह वाळू चोरटा ताब्यात appeared first on पुढारी.