Site icon

नाशिक : दोन तास बरसून त्याने पिके केली गारद

नाशिक (सिन्नर) : पुढारी वृत्तसेवा
तालुक्याच्या पश्चिम भागातील ठाणगाव परिसराला मंगळवारी (दि.11) दुपारी वादळी वार्‍यासह परतीच्या मुसळधार पावसाने झोडपले. सुमारे दोन तास पाऊस बरसला आणि पुन्हा पिके गारद होऊन अतोनात नुकसान झाले आहे.

ठाणगाव परिसरात दुपारी 4.30 च्या सुमारास वादळी वार्‍यासह विजांच्या कडकडाटात आणि ढगांच्या गडगडाटात मुसळधार पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे शेतकर्‍यांची धावपळ उडाली. सायंकाळी साडेसहा ते सातपर्यंत पाऊस सुरू होता. शेताचे बांध भरल्याने पिकांमध्ये पाणी शिरले होते. उभ्या पिकांत पाणी शिरल्याने मोठ्या नुकसानीचा अंदाज आहे. मुसळधार पावसामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. या भागात खरिपाचा हंगाम जवळपास वाया गेला आहे. वटाणा, टोमॅटो, चायनीज भाजीपाल्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडले. त्यातून सावरत शेतकर्‍यांनी रब्बी हंगामाची तयारी केली. त्यातही पुन्हा पाऊस पडल्याने शेतकर्‍यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे.

पावसाने आता थांबायला हवे …
तालुक्याच्या अन्य भागांच्या तुलनेत या भागात दरवर्षी पावसाचे प्रमाण अधिक असते. यंदाही पावसाळ्यात चारही महिने जोरदार पाऊस झाल्याने उंबरदरी धरणासह म्हाळुंगी नदी दुथडी भरून वाहत आहे. अशातच परतीचा पाऊस बरसल्याने नदीला पुन्हा पूर आला आहे. पावसाने आता थांबायला हवे, अशी प्रार्थना शेतकरी करीत आहेत.

हेही वाचा:

The post नाशिक : दोन तास बरसून त्याने पिके केली गारद appeared first on पुढारी.

Exit mobile version