नाशिक : दोन भामट्यांनी तरुणींना फसवलं; महागड्या भेटवस्तू, लग्नाचे दाखवले आमिष

online fraud

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

महागड्या भेटवस्तू देण्याचे व विवाहाचे आमिष दाखवून दोन भामट्यांनी तरुणींना आर्थिक गंडा घातल्याचे प्रकार उघडकीस आले आहेत. या प्रकरणी मुंबई नाका व नाशिकरोड पोलिस ठाण्यात फसवणूक प्रकरणी दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुंबई नाका पोलिस ठाण्यात गोविंदनगर येथील २९ वर्षीय तरुणीने दिलेल्या फिर्यादीनुसार, दोन भामट्यांनी नोव्हेंबर ते डिसेंबर २०२२ दरम्यान फसवणूक केली. संशयित मिघुल ऑइजिन व मुजायद्दीन खान या दोघांनी संगनमत करून तरुणीची ३५ हजार रुपयांची फसवणूक केली. तरुणीच्या फिर्यादीनुसार, इन्स्टाग्रामवरून भामट्याने ओळख करून तिला लंडनहून सोन्याचे दागिने, घड्याळ, पर्स आदी भेटवस्तू पाठवल्याचे सांगितले. मात्र कस्टम ड्यूटी व इतर कारणे सांगून त्याने तरुणीकडून ३५ हजार रुपये ऑनलाइन पद्धतीने घेतली. तरीदेखील भेटवस्तू न आल्याने फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तरुणीने पोलिसांकडे फिर्याद दाखल केली आहे. तर दुसऱ्या घटनेत एकलहरा कॉलनीतील २८ वर्षीय तरुणीची पुणे येथील एकाने फसवणूक केली.

तरुणीच्या फिर्यादीनुसार संशयित अनिरुद्ध दिनकर शिंगारे (२५, रा. चाकण, पुणे) याने डिसेंबर २०२२ ते मे २०२३ या कालावधीत सुमारे ५ लाख रुपयांचा गंडा घातला. संशयित अनिरुद्धने तरुणीसोबत लग्न ठरवले. लग्नाच्या खर्चासाठी तरुणीकडून ऑनलाइन पद्धतीने ९० हजार ५०० रुपये घेतले. तसेच तरुणीने लग्नासाठी चार लाख रुपयांचा खर्च केला. मात्र अनिरुद्धने लग्नाला नकार देऊन फसवल्याची फिर्याद तरुणीने नाशिकरोड पोलिसांत दिली आहे. याप्रकरणी पोलिस अधिक तपास करीत आहेत.

हेही वाचा :

The post नाशिक : दोन भामट्यांनी तरुणींना फसवलं; महागड्या भेटवस्तू, लग्नाचे दाखवले आमिष appeared first on पुढारी.