नाशिक : द्वारका, मुंबई नाका चौकात वाहनांसाठी अंडरपास

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

द्वारका तसेच मुंबई नाका चौकात नियमित होणारी वाहतूक कोंडी फोडण्याकरिता या दोन्ही चौकांचे पुनर्नियोजन करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेत त्यासाठी दुचाकी आणि चारचाकी वाहनांसाठी अंडरपास तयार करण्यात येणार असल्याचे ट्रॅफिक सेल अर्थात रस्ते सुरक्षा समितीच्या बैठकीत सांगण्यात आले.

मनपा आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या अध्यक्षतेखाली व पोलिस आयुक्त जयंत नाईकनवरे यांच्या प्रमुख उपस्थितीत गुरुवारी (दि.१०) ट्रॅफिक सेलची बैठक झाली. मिरची चौकात घडलेल्या अपघाताच्या पार्श्वभूमीवर शहरातील विविध अपघातस्थळांचे सर्वेक्षण तसेच ठोस उपाययोजना करण्याबाबत बैठकीत चर्चा झाली. मुंबई नाका चौकातील वेगवेगळ्या वेळांमध्ये होणारी वाहतूक कोंडी तसेच वेगवेगळ्या दिशेने चित्रण केलेल्या ड्रोनद्वारे काढलेले चित्रण दाखवून सर्कलची व्याप्ती कमी करण्याबराबेरच लेन वाढवण्याची तसेच अंडरपासची गरज पोलिस आयुक्त नाईकनवरे यांनी व्यक्त केली. चौकातील सूचना फलक, रंग, डिझाइन निश्चित करणे, विविध ठिकाणी वाहतूक नियोजन व पेट्रोलिंगच्या दृष्टीने पोलिस चौक्यांची ठिकाणे, डिझाइन तसेच मिरची चौकातील टेम्पलेट याबाबत अहवाल दिल्यास त्याबाबत त्वरित काम केले जाईल, असे त्यांनी सांगितले. बैठकीला प्रादेशिक परिवहन अधिकारी प्रदीप शिंदे, बांधकाम विभागाचे उपअभियंता अविनाश देवरे, एनएचएआयकडून शशांक आडके, रेझिलिइन्ट इंडिया कंपनीचे प्रतिनिधी राजीव चौबे, प्रियंका लखोटे, प्रभारी अतिरिक्त आयुक्त अर्चना तांबे, उपआयुक्त करुणा डहाळे, डॉ. विजयकुमार मुंढे, शहर अभियंता शिवकुमार वंजारी, अधीक्षक अभियंता उदय धर्माधिकारी, नगर नियोजन विभागाचे उपसंचालक हर्षल बाविस्कर, के. के. वाघ इंजिनिअरिंग कॉलेजचे प्रा. डॉ. विलास पाटील, शासकीय तंत्रनिकेतनचे प्रा. डॉ. रवींद्र सोनोने उपस्थित होते. मनपाने मिरची चौकासह औरंगाबाद रोडवरील नांदूर नाका, सिद्धिविनायक चौक या तीन ठिकाणी उड्डाणपूल उभारण्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

विनाहेल्मेटमुळे मृत्यूंत वाढ

रेझिलिइन्ट इंडिया कंपनीतर्फे तांत्रिक मुद्द्यांचा अभ्यास करून येत्या १५ दिवसांत अपघातस्थळांचे सर्वेक्षण करून आवश्यक उपाययोजनांचा अहवाल सादर करणार असल्याचे राजीव चौबे यांनी सांगितले. वाहनांची वेगमर्यादा ३० ची असेल तर अपघातातील मृत्यूचे प्रमाण दहा टक्के असते. मात्र, वेग ६० किमी प्रतितास असेल तर मृत्यूचे प्रमाण ९५ टक्के असते. तसेच विनाहेल्मेटमुळेही मृत्यूचे प्रमाण वाढल्याची माहिती सादरीकरण करताना देण्यात आली.

१८६ अपघातांत ६० मृत्यू

जानेवारी ते सप्टेंबर २०२२ या नऊ महिन्यांच्या कालावधीत शहरात घडलेल्या अपघातांची माहिती बैठकीत देण्यात आली. वेगात वाहन चालविल्यामुळे १८६ अपघात घडले. त्यात ६० जणांचा मृत्यू झाला. हेल्मेट परिधान न केल्यामुळे झालेल्या दुचाकी अपघातांत ४८ जणांचा मृत्यू झाल्याचे पोलिस प्रशासनाने सांगितले.

हायवे पेट्रोलिंगसाठी १६ जीपची गरज

वाहतूक विभागासाठी स्वतंत्र उपआयुक्त दर्जाचा अधिकारी नेमण्यात येणार आहे. हायवे पेट्रोलिंगकरिता १६ जीप व १६ मोटारसायकलींची गरज. शहरातील बंद असलेले ७ सिग्नल पुन्हा सुरू करणार. २३ ब्लॅक स्पॉटस्वर सिग्नल बसविण्यात येणार असून, चौकांमध्ये सीसीटीव्ही तसेच आवश्यक सुधारणा करण्यात येणार असल्याचे मनपा, पोलिस प्रशासनाकडून सांगण्यात आले.

हेही वाचा:

The post नाशिक : द्वारका, मुंबई नाका चौकात वाहनांसाठी अंडरपास appeared first on पुढारी.