नाशिक : धम्मचक्र अनुप्रर्वतन दिनानिमित्त त्रिरश्मी लेणी येथे उसळला भीमसागर

धम्मचक्र अनुप्रर्वतन दिन,www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
सम्राट अशोक विजयादशमी, 66 वा धम्मचक्र अनुप्रवर्तन दिन तसेच बुद्धस्मारक वर्धापन दिन बुधवारी (दि. 5) त्रिरश्मी लेणी येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. सकाळपासूनच बौद्ध लेणी परिसरात धम्म उपासक-उपासिकांची गर्दी होती. हजारो बौद्ध उपासकांनी बुद्धस्मारकात भगवान गौतम बुद्ध व बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेसमोर नतमस्तक होत अभिवादन केले. ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो’ आणि ‘जय भीम’चा जयघोष करीत तरुणांनी प्रवर्तन दिनाचा उत्साह वाढवला.

त्रिरश्मी बुद्ध लेणी व स्तुप विकास संस्था, शांतिदूत चॅरिटेबल ट्रस्ट व नाशिक महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने बुद्धस्मारक परिसरात सकाळी नऊ वाजता पंचशील धम्मध्वजाचे रोहण करण्यात आले. यावेळी नाशिक भिक्षू संघाचे पूज्य भदंत यू नागधम्मो महास्थवीर, शांतीदूत चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष भदन्त सुगत, भदन्त आर्यनाग, भदन्त धम्मरक्षित, भदन्त धम्मरत्न, भदन्त संकल्प, माजी नगरसेवक राकेश दोंदे, वामन गायकवाड, ताराचंद जाधव, बाळासाहेब शिंदे आदींच्या उपस्थितीत बुद्धवंदना घेण्यात आली.

धम्मचक्र प्रवर्तन दिनाचे औचित्य साधून बुद्धलेणी परिसरात आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती. त्यामुळे सायंकाळनंतर परिसर उजळून निघाला होता. कोरोनाच्या दोन वर्षांच्या निर्बंधानंतर मोठ्या प्रमाणात धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा होत असल्याने उपासक-उपासिकांची त्रिरश्मी लेणी परिसरात झुंबड उडाली होती. मुंबई-आग्रा महामार्गावरील वाहनांची कोंडी होऊ नये म्हणून वाहतूक शाखेने विशेष नियोजन केले होते. तर अनुचित घटना टाळण्यासाठी विशेष पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

वविध कार्यक्रमांचे आयोजन
धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त त्रिरश्मी लेणी परिसरात विविध सामाजिक व राजकीय संघटनांकडून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. काही संघटनांनी नाश्त्यासह भोजनाची व्यवस्था केली होती. तर काही संघटनांनी प्रबोधनात्मक कार्यक्रमासाठी व्यासपीठ उभारले होते. पुस्तक विक्री स्टॉललाही उपासक उपासिकांची चांगली पसंती मिळाली.

राजकीय नेत्यांची मांदियाळी
आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वपक्षीय नेत्यांसह इच्छुक उमेदवारांची त्रिरश्मी लेणी येथे मांदियाळी दिसून आली. त्याचप्रमाणे अनेकांनी विविध सामाजिक उपक्रम राबवत राजकारणात आपणही सक्रिय असल्याचे दाखविण्याचा प्रयत्न केला.

हेही वाचा :

The post नाशिक : धम्मचक्र अनुप्रर्वतन दिनानिमित्त त्रिरश्मी लेणी येथे उसळला भीमसागर appeared first on पुढारी.