
देवगाव (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा
भारतीय सैन्य दलातील जवान श्रीराम राजेंद्र गुजर (२४) यांच्या अपघाती निधनानंतर मंगळवारी (दि. १८) धानोरे (ता. निफाड) येथे शोकाकुल वातावरणात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
श्रीराम भारतीय सैन्य दलात आसाम येथे बॉम्बे इंजिनिअर कोर २३६ आयटी युनिटमध्ये शिपाई जहाज ऑपरेटर म्हणून कार्यरत होते. ते सुटीनिमित्त घरी आलेले असताना पाथरे गावाजवळ अपघातात जखमी झाले होते. उपचादारम्यान सोमवारी (दि. १७) त्यांचे निधन झाले. देवळाली कॅम्प येथील आर्टिलरी सेंटरचे सुभेदार टी. क्रिस्टोपर यांच्या तुकडीने तसेच माजी सैनिक आणि लासलगाव पोलिस यांनी त्यांना अखेरची मानवंदना दिली. यावेळी सजविलेल्या रथातून श्रीराम यांची अंत्ययात्रा काढण्यात आली. अंत्ययात्रेत ‘भारत माता की जय’, ‘वंदे मातरम’, ‘श्रीराम भय्या अमर रहे’ अशा घोषणा देत जनसागराने साश्रुनयनांनी श्रीराम यांना अखेरचा निरोप दिला. जवान श्रीराम याचे आजोबा संतू गुजर, वडील राजेंद्र, आई अनिता, भाऊ नितीन, बहीण प्रियंका आदींच्या आक्रोशाने उपस्थित जनसमुदायाचे मन हेलावले होते.
याप्रसंगी देवळाली कॅम्प ६ फिल्ड रेजिमेंटचे सुभेदार टी. क्रिस्टोपर, नायब सुभेदार मस्के, उपविभागीय अधिकारी हेमांगी पाटील, तहसीलदार शरद घोरपडे, सहायक पोलिस निरीक्षक राहुल वाघ, मंडळ अधिकारी संतोष डुंबरे, पोलिस निरीक्षक दौलत जाधव, बाळासाहेब पगारे, त्रिदल सैनिक संघाचे अध्यक्ष तुषार खरात, कॅप्टन मार्तंड दाभाडे , माजी पं.स. समिती सदस्य भाऊसाहेब बोचरे, माजी सरपंच विनोद जोशी, राष्ट्रवादीचे शाहू शिंदे, शिवसेना तालुकाप्रमुख प्रकाश पाटील आदींसह पंचक्रोशीतील ग्रामस्थ उपस्थित होते.
हेही वाचा :
- Herschel Gibbs : ४९ व्या वर्षी हर्शल गिब्ज दुसर्यांदा चढणार बोहल्यावर
- क्रेडिट युटिलायझेशन रेश्यो म्हणजे काय? जाणून घ्या अधिक
- Jammu and Kashmir : जम्मु काश्मीरमध्ये दहशतवाद्यांचा गोळीबार; दोन नागरिक जखमी
The post नाशिक : धानोरेतील जवान श्रीराम गुजर अनंतात विलीन appeared first on पुढारी.