नाशिक : धारदार शस्त्रांसह आलेल्या चौघांच्या टोळीला अटक

सिन्नर : (जि. नाशिक) पुढारी वृत्तसेवा
खंबाळे शिवारात धारदार शस्त्रांसह चौघा जणांच्या टोळीला वावी पोलिसांनी शिताफीने अटक केली आहे. काही व्यक्ती धारदार शस्त्रे बाळगून फिरत असल्याची माहिती बुधवारी (दि. 17) सहायक निरीक्षक सागर कोते यांना मिळाली होती. पोलिस अधीक्षक सचिन पाटील, अपर अधीक्षिका माधुरी कांगणे, उपअधीक्षक सोमनाथ तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक कोते व कर्मचार्‍यांनी परिसरात शोध घेतला. सफेद रंगाची अल्टो कार (एमएच 15 एफएफ 5819)मध्ये संशयित माळवाडीकडून खंबाळेच्या दिशेने येत असताना पोलिसांनी कार थांबवली. उडवाउडवीची उत्तरे दिल्यानंतर घेतलेल्या झडतीत 16 इंच लांबीचा लोखंडी कोयता, धारदार कुकरी आढळून आली.

पोलिसांनी भैया ऊर्फ प्रवीण गोरक्षनाथ कांदळकर (23, रा. शहा), गौरव देवीदास घोटेकर (23, रा. शहा), महेश उत्तम वाकचौरे (21, रा. खंबाळे), शंकर मधुकर गोळेसर (32, रा. लोणारवाडी) यांना ताब्यात घेतले आहे. यातील घोटेकर हा चार दिवसांपूर्वी झालेल्या वाहनचालकांच्या लुटीत सहभागी असल्याचे समोर आल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

हेही वाचा :

The post नाशिक : धारदार शस्त्रांसह आलेल्या चौघांच्या टोळीला अटक appeared first on पुढारी.