नाशिक, धुळ्यात सीएनजीचा दर आता झाला 92.50 रूपये

CNG Rate

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
नाशिकसह धुळे जिल्ह्यात सीएनजी दरात प्रतिकिलो 3.40 रुपयांची कपात करण्याचा निर्णय महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेडने (एमएनजीएल) घेतला असून, ही दरकपात बुधवार (दि.17)पासून लागू झाली आहे. नाशिकमध्ये आता वाहनचालकांना प्रतिकिलो सीएनजीकरता 95.90 रुपयांऐवजी 92.40 रुपये मोजावे लागणार असल्याने मोठा दिलासा मिळणार आहे.

नाशिक, धुळे या शहरांमध्ये सीएनजी वाहनांमध्ये मोठी वाढ हात असल्याने सीएनजी गॅससाठी मागणीही वाढू लागली आहे. नाशिक आणि धुळे या ठिकाणी सीएनजीला मागणी वाढत असल्याने गॅसचा पुरवठा तोकडा पडू लागल्याने गॅसचे दर महागले होते. यामुळे सीएनजी वाहनधारकांकडून नाराजी व्यक्त केली जात होती. काही दिवसांपूर्वीच सीएनजी दरात 6 रुपयांची वाढ करण्यात आली होती. त्यामुळे सीएनजीचे दर प्रतिकिलो 95.90 रुपयांवर पोहोचले होते. घरगुती नैसर्गिक वायूच्या खरेदी किमतीत घट झाल्याने महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेडने सीएनजीच्या दरातही कपात घोषित केली आहे. कंपनीने कमी झालेल्या गॅसच्या किमतीचा फायदा ग्राहकांना देण्याचा निर्णय घेतला असून, नाशिक व धुळे जिल्ह्यात सीएनजीचे दर 3.40 रुपये प्रतिकिलोने कमी केल्याने वाहनधारकांना दिलासा मिळाला आहे. महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड हा गॅस अ‍ॅथोरिटी ऑफ इंडिया लिमिटेड आणि भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लि.चा संयुक्त उपक्रम आहे.

47 टक्के होणार बचत
महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड ही कंपनी पुणे, पिंपरी-चिंचवड तसेच हिंजवडी, चाकण आणि तळेगाव यासह महाराष्ट्रातील धुळे, नाशिक व सिंधुदुर्ग जिल्हा, गुजरातमधील बलसाड आणि कर्नाटकातील रामनगर या भौगोलिक क्षेत्रांतील एक प्रमुख शहर गॅस वितरण कंपनी आहे. सीएनजी गॅसच्या दरकपातीनंतर एमएनजीएलचे सीएनजी दर हे आता पेट्रोल आणि डिझेलच्या तुलनेत वाहनांसाठी अनुक्रमे 47 टक्के आणि 24 टक्के अशी बचत देणार आहेत. ऑटोरिक्षांसाठी स्पर्धात्मकता व उत्तम मायलेज यामुळे सुमारे 24 टक्के इतकी बचत होण्याचा दावा कंपनीने केला आहे.

हेही वाचा :

The post नाशिक, धुळ्यात सीएनजीचा दर आता झाला 92.50 रूपये appeared first on पुढारी.