नाशिक : धोतरखेडे शिवारामध्ये अपघात ; एक ठार, एक गंभीर

अपघात

नाशिक (चांदवड) : पुढारी वृत्तसेवा

तालुक्यातील धोतरखेडे गावच्या शिवारातील मुंबई-आग्रा महामार्गावर समोरून जाणाऱ्या दुचाकीला भरधाव येणाऱ्या चारचाकीने मागच्या बाजूने जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात दुचाकीचालक ठार झाला, तर मागे बसलेली महिला गंभीर जखमी झाली असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या घटनेबाबत सोमनाथ सयाजी जाधव (३५, रा. कानमंडाळे) यांनी फिर्याद दिल्याने वडनेरभैरव पोलिसांत चारचाकी गाडी चालकाविरोधात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तालुक्यातील कानमंडाळे येथील सयाजी बाळूबा जाधव (६५) हे पत्नी चहाबाई सयाजी जाधव यांच्या सोबत दुचाकीने (एमएच १५ डीजे ८३७३) मुंबई-आग्रा महामार्गावरून जात होते. त्यावेळी चांदवडकडून नाशिककडे भरधाव जाणाऱ्या टाटा इंट्रा गाडी (एमएच १५ एचएच ५३७१) चालकाचे नियंत्रण सुटल्याने दुचाकीला पाठीमागच्या बाजूने जोरदार धडक दिली. यात दुचाकीचालक सयाजी जाधव यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा मृत्यू झाला, तर पत्नी चहाबाई यांना गंभीर दुखापत झाली असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. दरम्यान, अपघात झाल्यानंतर चारचाकी वाहनाच्या अज्ञात चालकाने घटनास्थळावरून पळ काढला. हा अपघात धोतरखेडे शिवारात घडला. पोलिस नाईक घुमरे अधिक तपास करीत आहेत.

हेही वाचा:

The post नाशिक : धोतरखेडे शिवारामध्ये अपघात ; एक ठार, एक गंभीर appeared first on पुढारी.