Site icon

नाशिक : नंदिनी नदीच्या संरक्षणसाठी आता सीसीटीव्ही कॅमेरे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा 

नंदिनी नदीचे संरक्षण व्हावे आणि प्रदूषण रोखले जावे, यासाठी या नदीच्या दोन्ही किनारी उंटवाडी ते गोविंदनगरपर्यंत 10 ठिकाणी एकूण २६ कॅमेरे बसविण्याचे स्मार्ट सिटीने निश्चित केले आहे. याबाबतचे पत्र शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष व सत्कार्य फाउंडेशनला प्राप्त झाले आहे.

गोदावरीची उपनदी असलेल्या नंदिनी नदीमध्ये मोठ्या प्रमाणात घाण व कचरा टाकून प्रदूषण केले जाते. वाळू उपसाही मोठ्या प्रमाणात केला जातो. मद्यपी, गर्दुल्ले हे नदीपात्रात येऊन बसतात. येथे लपण्यासाठी गुन्हेगारही आश्रय घेतात. नंदिनीमुळे गोदावरीचेही प्रदूषण वाढते. नागरिकांना गुन्हेगारीचा त्रास होतोच. परंतु, त्यांचे आरोग्यही धोक्यात येते. प्रदूषण रोखण्यास मदत व्हावी, नदी व परिसरातील नागरिकांचे संरक्षण व्हावे, यासाठी नदीच्या दोन्ही किनारी उंटवाडी ते गोविंदनगरपर्यंत सीसीटीव्ही कॅमेरे बसवावे, अशी मागणी शिवसेना, सत्कार्य फाउंडेशनने बाबासाहेब गायकवाड (देशमुख), चारुशीला गायकवाड (देशमुख) यांच्या पुढाकाराने महापालिका आयुक्त आणि स्मार्ट सिटीकडे दि. ७ व ८ डिसेंबर २०२१ रोजी केली होती.

गायकवाड दाम्पत्याने सतत पाठपुरावा केला. महापालिका आयुक्तांनी या विषयाला १६ मार्च २०२२ ला मंजुरी देऊन त्याबाबतचे पत्र व नकाशे स्मार्ट सिटीला दिले होते. स्मार्ट सिटी संचालक मंडळाच्या २३ व्या बैठकीत दि. २४ सप्टेंबर २०२२ रोजी या विषयाला मंजुरी देण्यात आली. इतिवृत्तही मंजूर करण्यात आले. निविदा प्रक्रिया पार पडल्यानंतर संबंधित कॉन्ट्रॅक्टरला वर्कऑर्डर देण्यात आली आहे. याबाबतचा स्थळ पाहणी तांत्रिक अहवाल स्मार्ट सिटीला कॉन्ट्रॅक्टरने दिला आहे.

…तर निष्क्रियतेची घंटी वाजवू

प्रभागात शिवसेना, सत्कार्य फाउंडेशनकडून विविध विकासकामे करण्यात आली. त्याचे फुकटचे श्रेय काहींनी लाटले. काही कामे मंजूर होऊ नये, त्यांची वर्कऑर्डर निघू नये, मंजूर काम सुरू होऊ नये, सुरू झालेले काम बंद करणे, असे उद्योग श्रेय न मिळाल्याने राजकीय आकसापोटी केले जात आहेत. नंदिनीचे हे काम थांबण्यासाठी संबंधित यंत्रणेवर दबाव टाकला जाण्याची शक्यता आहे. तसे झाल्यास पर्यावरणप्रेमी व प्रभागातील नागरिकांतर्फे आंदोलन करण्यात येईल तसेच संबंधितांच्या निष्क्रियतेची घंटी वाजवून पर्दाफाश करण्यात येईल, असा इशाराही शिवसेना, सत्कार्य फाउंडेशनने दिला आहे.

हेही वाचा : 

The post नाशिक : नंदिनी नदीच्या संरक्षणसाठी आता सीसीटीव्ही कॅमेरे appeared first on पुढारी.

Exit mobile version