नाशिक : पुढारी वृत्तसेवा, यंदा समाधानकारक पाऊस न झाल्याने जायकवाडी धरणातील सध्याचा ४५ टक्के जलसाठा लक्षात घेता, मराठवाड्याकरिता नाशिक व नगरच्या धरणांमधील पाणी सोडावे लागण्याची दाट शक्यता आहे. पाणी आरक्षण बैठकीतून यावर शिक्कामोर्तब होणार आहे. त्यातून जलसंघर्ष निर्माण होण्याची चिन्हे आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरुवारी (दि. २६) शिर्डी दौऱ्यावर येत आहेत. या दरम्यान जलसंघर्षाचा अंक घडू नये, यासाठी नाशिकची पाणी आरक्षण बैठक लांबणीवर टाकण्यात आल्याचे सांगितले जात आहे.
सुरुवातीला अल निनोचा प्रभाव आणि त्यानंतर घडलेल्या हवामानबदलामुळे यंदा मान्सूनची कामगिरी निराशाजनक राहिली. धरणांच्या पाणलोट क्षेत्रात कोसळलेल्या पावसामुळे नाशिक आणि नगर जिल्ह्यांतील धरणे भरली असली, तरी नाशिकच्या पावसाकडे डोळे लावून बसलेल्या मराठवाड्यातील जायकवाडी धरण मात्र जेमतेम ४५ टक्केच भरू शकले आहे. जोरदार पावसामुळे नाशिक व नगरच्या धरणांतून केल्या जाणाऱ्या विसर्गामुळे जायकवाडी धरण भरते. जायकवाडी धरणाला स्वत:चे पाणलोट क्षेत्र नाही. यंदा मात्र समाधानकारक पाऊस न झाल्यामुळे गोदावरी अपवादात्मक परिस्थितीतच दुथडी भरून वाहिली. गंगापूर, दारणा धरण समूहातून अल्पशा विसर्गामुळे गोदावरीला दोनवेळा लहान पूर आले. त्यातून नाशिकमधून १६.७ टीएमसी पाणी जायकवाडीच्या दिशेने वाहिले.
नगरच्या धरणांतूनही काही प्रमाणात विसर्ग झाल्यामुळे जायकवाडी धरण ४५ टक्क्यांपर्यंत मजल मारू शकले. सद्यस्थितीत गंगापूर धरण समूह (गंगापूर, काश्यपी, गौतमी गोदावरी, आळंदी) ९९ टक्के भरले आहे. पालखेड समूह ९६ टक्के, तर दारणा धरण समूह (दारणा, भावली, मुकणे, वालदेवी, कडवा, नांदूरमध्यमेश्वर) ९७ टक्के भरले आहे. समन्यायी पाणीवाटप धोरणानुसार जायकवाडी धरण ६५ टक्के भरणे अपेक्षित आहे. पावसाळा जवळपास सरल्यामुळे आता पाऊस होण्याची शक्यता धूसर झालेली आहे. त्यामुळे मराठवाड्याकरिता जायकवाडी धरणासाठी नाशिक व नगरच्या धरणांतून विसर्ग करावा लागण्याची दाट शक्यता आहे. जायकवाडीला पाणी सोडण्यास नगरकरांनी विरोध दर्शविला आहे. नाशिकमधूनही विरोधाचा सूर आळवला जात आहे.
या पार्श्वभूमीवर नाशिक व नगरचे पाणी पेटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. १५ ऑक्टोबर रोजीची धरणांतील जलपातळी लक्षात घेऊन महापालिकेसह शासकीय, निमशासकीय संस्थांसाठी तसेच शेती व उद्योगांसाठी पाणी आरक्षण निश्चित केले जात असते. दरवर्षी साधारणत: २० ऑक्टोबरपर्यंत पाणी आरक्षणाचा निर्णय होत असतो. परंतु यंदा २४ ऑक्टोबर उलटल्यानंतरही पाणी आरक्षण बैठकीला मुहूर्त लाभलेला नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरुवारी (दि. २६) शिर्डी दौऱ्यावर येत आहेत. पाणी आरक्षण बैठकीतून जायकवाडीला पाणी सोडण्यासंदर्भातील निर्णयावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. त्यामुळे जलसंघर्ष उभा राहण्याचा धोका आहे. अशा परिस्थितीत पंतप्रधानांच्या दौऱ्यात आंदोलने होऊ नये, यासाठी पाणी आरक्षण बैठक लांबणीवर टाकण्यात आल्याची चर्चा आहे.
नाशिक-नगरमधून जायकवाडीसाठी १२ टीएमसी पाणी?
नाशिक व नगरच्या धरणांतून जायकवाडीसाठी सुमारे १२ ते १३ टीएमसी पाणी सोडावे लागण्याची शक्यता आहे. यात नाशिकच्या धरणांतून ४ ते ५ टीएमसी पाणी सोडावे लागू शकते. नाशिककरांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणातूनही किमान एक टीएमसी पाणी सोडावे लागणार असून, यंदा महापालिकेची पाणी आरक्षणाची मागणी १०० टक्के पूर्ण होऊ शकणार नसल्याची तोंडी सूचना जलसंपदाकडून महापालिकेच्या अधिकाऱ्यांना देण्यात आल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.
हेही वाचा :
- Closing Bell : सुरुवात चांगली; पण पुन्हा ‘घसरगुंडी’!, आज शेअर बाजारात नेमंक काय घडलं?
- Asian Para Games 2023 : बॅडमिंटनमध्ये वैष्णवी आणि मानसीला कांस्य
- अलीबाग : ‘दृश्यम’ची आयडिया घेऊन २ बहिणींचा खून; सर्च हिस्ट्रीमुळे पोहोचला तुरुंगात | Murder of 2 sisters Alibaug
The post नाशिक -नगरचे पाणी पेटण्याची शक्यता appeared first on पुढारी.